शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी राजकीय घडामोड अपक्ष अर्ज दाखल झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या निर्णयाला खोडा बसण्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, शिर्डी
नगरपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्यानंतर निवडणूक रद्द होण्याची परिस्थिती असतानाच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्डीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष असलेले सुरेश आरणे यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिर्डीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यातील नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीची लोकसंख्या 36 हजारांपेक्षा जास्त असल्याने नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा द्या, अशी मागणी या सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आहे. शिर्डीचे विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी 2016 साली यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. 1 ते 6 डिसेंबर या कालावधीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक रद्द होण्याची चिन्हे होती. त्यातच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने नगरपरिषदेसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 7 डिसेंबर रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश आरणे यांनी पदाचा राजीनामा देत पोलीस संरक्षणात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिर्डीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सुरेश आरणे यांनी प्रभाग क्रमांक 11 (अनुसूचित जाती) मधून तर त्यांची पत्नी अनिता आरणे यांनी प्रभाग क्रमांक 1 (सर्वसाधारण महिला) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आरणे यांच्यासह आणखी काही जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यासाठी मोर्चेबांधणी करणार्या शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या निर्णयाला खोडा बसण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्डीत मोठी राजकीय घडामोड घडल्याने शिर्डीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरेश आरणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. सर्वपक्षीय म्हणवणार्या नेत्यांनी मला बैठकीला आमंत्रित केले नव्हते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या प्रभागात फेरबदल झाल्याने या नेत्यांनी नगरपरिषद व्हावी हा मुद्दा बाहेर काढला. यात मला काहीतरी गडबड वाटत असल्याने मी उमेदवारी अर्ज दाखल केला, असे त्यांनी स्पष्ट केले.

विखे पाटील शिर्डीत तळ ठोकून..
शेवटच्या दिवशी शिर्डीत राजकीय उलथापालथ झाल्याने भाजपचे नेते व शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे दुपारपासूनच शिर्डीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
