रब्बी पिकांसाठी मुळातून आवर्तन सोडा! सलाबतपूर परिसरातील शेतकर्‍यांची मागणी


नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सलाबतपूर परिसरात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून मुळा कालव्यातून लवकर आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

सध्या रब्बीतील गहू, हरभरा, तूर, मका, ऊस, कांदा या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. अनेकांच्या विहीर, कूपनलिकांची पाणी पातळी खालावली असून शेतकर्‍यांची पिके सध्या जोमदार आहेत. मात्र पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर पिके जळून खाक होऊन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी रब्बी पिकांना हवामानातील वातावरण अनुकूल आहे. अनेकांची पिके जोमदार आहे. मात्र पाटपाणी जर उशिरा आले तर पिकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी खरीप पिकांची अस्मानी संकटाने पार दयनीय अवस्था करून टाकली होती.

जास्तीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकर्‍यांना सुरुवातातीला दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर पुन्हा अस्मानी संकटाला. यामुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. यंदा कापसाला उच्चांकी आठ हजारांचा भाव मिळाला. परंतु, शेतकर्‍यांचा कापूस पावसाच्या अवकृपेने पूर्णपणे वाया गेला होता. तर सोयाबीन पाण्याने सडून गेली होती. तसेच अनेकांच्या तूर पिकावर मर रोग आल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. खरीपाची वाट लागल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाले आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना रब्बी पिकांतून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. मात्र विहीर व कूपनलिका यांची पाणी पातळी खालावली असल्याने पुन्हा चिंतेचे ढग दाटून येऊ लागले आहे. शेती पिकांना लवकर पाणी मिळाले नाही तर पिके जळून जातील व शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होवून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर मुळातून आवर्तन सोडून शेती पिके व शेतकर्‍यांनाही वाचवा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Visits: 18 Today: 2 Total: 117339

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *