… तोपर्यंत पठारभागाच्या पाणी योजनेचा फुटबॉल बसणार नाही! ः गायकर पिंपळगाव खांड धरणाचा पाणीप्रश्न पेटला; पुन्हा चर्चा करुन प्रश्न सोडविणार

नायक वृत्तसेवा, अकोले
मुळा खोर्यातील पिंपळगाव खांड धरणातील पाण्याला धक्का न लावता पठारभागाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र पाणीसाठे निर्माण करू. मगच पाणी पुरवठा योजनांचा नारळ फोडू, जोपर्यंत हे काम मार्गी लागणार नाही. तोपर्यंत पाणी योजनेचा फुटबॉल बसणार नाही, असा खुलासा ज्येष्ठ नेते व जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केला.
![]()
पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यातील पठारभागाला पिंपळगाव खांड धरणातून पाणी पळविण्याच्या वादावरून निर्माण झालेल्या संघर्षावर मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, काँग्रेस नेते मीनानाथ पांडे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी गायकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुढे बोलताना गायकर म्हणाले, अजित पवार अकोल्यात आले तेव्हा आम्ही पिंपळगाव खांड धरणाची मागणी केली आणि दादांनी त्याचवेळेस शब्द देत 50 कोटी रुपये तत्काळ धरण कामासाठी वर्ग केले म्हणून हे काम मार्गी लागले. महानंदच्या बैठकीला मुंबईत जात असताना आम्ही सर्वांनी या धरणासाठी पाठपुरावा केला. अजितदादांसारख्या कर्तबगार माणसाच्या आग्रही भूमिकेमुळे पिंपळगाव खांड धरण एका वर्षात पूर्ण झाले. हे काम करत असताना अकोल्याचे सुपुत्र सेवानिवृत्त अधिकारी रो. मा. लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे मुळा बारामहा झाली. त्यावेळी अजित पवार, पद्मसिंह पाटील, मधुकर पिचड व आम्ही पाठपुरावा केल्यामुळे पिंपळगाव खांड धरण मार्गी लागले. पिंपळगाव खांड धरणामुळे खालचे पाणी आणि वरचे पाणी असा वाद थांबला. पण तरीही पिंपळगाव खांडचे पाणी हे तेवढं पुरेसं नाहीये. धरणामुळे मुळा परिसरात अनेक पाणी योजना सुरू होत आहे. शेती उभी राहत आहे. अनेकांनी कर्ज घेऊन आपली शेती उभी केली आहे. यामुळे या धरणाचे पाणी बाहेर जाऊ द्यायचे नाही, यातून वाद होणे, संघर्ष उभा राहणे ही गोष्ट सहाजिकच आहे पण तसे होणार नाही. ज्यांनी पिंपळगाव खांड धरण दिले ते आपल्या शेतकर्यांना उघडे करणार नाही. या धरणाच्या पाणीसाठ्याला धक्का न लावता धरणाच्या खालील बाजूस व पठार भागात मुळा नदीवर जेथे जेथे शक्य आहे त्याठिकाणी बंधारे अथवा केटीवेअर घेऊन या पाणी योजनेसाठी पाणी निर्माण करुन आवश्यक असणारा 20 ते 25 एमसीएफटीचा पाणीसाठा तयार करून त्यातून पाणी पुरवठा होईल. त्यासाठी स्वतंत्र साठवण तलाव उभा करुन पठार भागातील 11 गावांसाठी प्रस्तावित असलेल्या योजनेसाठी पाणी कसे देता येईल अशी चर्चा अजितदादांसोबत झाली असे गायकर यांनी सांगितले.

कोणताही राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी पिण्याच्या पाण्याची योजना होऊ नये अशी भूमिका कधीही घेणार नाही. पठार भागाच्या पाणी योजनेसाठी कोणताही संघर्ष होऊ देणार नाही. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचे आघाडी सरकार असल्याने कुठलाही संघर्ष होणार नाही तशी वेळही येऊ देणार नाही. शेतकर्यांच्या हितासाठी मी स्वतः धरणात उडी घेईन, पण संघर्ष होऊ देणार नाही असेही गायकरांनी सांगितले. ज्यांनी धरण दिले, मुळा बांधण्यासाठी प्रयत्न केले त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पठार भागाचा पाणीप्रश्न निश्चित सोडवला जाईल. पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस घारगावपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी साईट उपलब्ध आहे असेल त्या-त्या ठिकाणी पाणीसाठा वाढवून पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावू. पाणीसाठा जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत योजनेचा फुटबॉल बसणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजून हा प्रश्न मार्गी लावू. मुळा विभागाने मला चाळीस वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी दिली यात मी समाधानी आहे. यापुढेही जनतेबरोबर राहील असा विश्वास देत संगमनेर-अकोले दोन्ही तालुके जीवाभावाचे आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे अतिशय संयमी नेतृत्व आहे, त्यांच्याशी बोलून लवकरच अजितदादांकडे शिष्टमंडळासह पुन्हा चर्चा करू असे गायकरांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मीनानाथ पांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, भाऊसाहेब बराते, विकास शेटे, भानुदास डोंगरे, सुभाष गोडसे, भाऊसाहेब रकटे, बाळासाहेब रंधे, किशोर गोडसे यांनीही आपली भूमिका मांडत गायकर जी भूमिका घेतली ती चुकीची राहणार नाही. त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहू असे सांगितले. यावेळी विठ्ठल चासकर, विजय वाकचौरे, शरद चौधरी, सुरेश देशमुख, आत्माराम शेटे, शिवाजी वाल्हेकर आदिंसह मुळा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
