अवैध धंदेवाईकांना मिटकेंचे सलग धक्के! श्रीरामपूरात बेकायदा व्यावसायिकांची पळापळ; सव्वा लाखाच्या दारुचा नाश..
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
धडाकेबाज पोलीस उपअधीक्षक म्हणून ख्याती प्राप्त करणार्या श्रीरामपूर उपविभागाच्या पोलीस अधीक्षकांनी तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरु केली असून तिनच दिवसांत तब्बल साडेतीन लाखांची गावठी दारु हस्तगत करण्यात आली आहे. उपअधीक्षक मिटके यांच्या पथकाकडून एकामागून एका कारवायांचा धडाका सुरु झाल्याने श्रीरामपूरातील बेकायदा धंदेवाईकांची पळापळ सुरु झाली आहे. आजही त्यांच्या पथकाने टाकळीभान परिसरात छापेमारी करुन 1 लाख 15 हजार रुपयांच्या गावठी दारुचा नाश केला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांच्या पथकाने केलेली ही सलग दुसरी मोठी कारवाई आहे.
याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील टाकळीभान शिवारात मोठ्या प्रमाणात गावठी (हातभट्टीची) दारु तयार केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर मिटके यांनी आवश्यक त्या सूचना देत आपल्या पथकाला सदर ठिकाणी जावून कारवाईचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार टाकळीभान येथे पोलिसांनी छापा घातला असता तीन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याचे पथकाला आढळले. यावेळी पोलिसांनी पहिल्या ठिकाणी कारवाई करतांना 42 हजार रुपये किंमतीचे तब्बल 600 लिटर दारु तयार करण्याचे रसायन व अडीच हजार रुपये किंमतीची तयार दारु असा 44 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून त्याची जागेवरच विल्हेवाट लावली. या प्रकरणी संजय कारभारी गांगुर्डे (रा.माळेवाडी, ता.श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून गणपत डुकरे हा मात्र पोलिसांना पाहताच घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी आपला मोर्चा टाकळीभान शिवरातील गावठाणात असलेल्या शांताबाई गणपत जाधव यांच्या दारु बनविण्याच्या उद्योगाकडे वळविला. या कारवाईत पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेत 31 हजार 500 रुपये किंमतीचे साडेचारशे लिटर रसायन व 20 हजार रुपयांची तयार गावठी दारु जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली, याच वेळी अन्य एका पथकाने गावठाणातच असलेल्या आशाबाई शिवाजी पवार यांच्या हातभट्टीवर छापा घालीत 35 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर रसायन व दोन हजार रुपयांची तयार दारु असा एकूण 37 हजारांच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली. या प्रकरणी सदरील महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज भल्या सकाळीच केलेल्या या कारवाईत उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने तब्बल 1 लाख 15 हजार रुपयांचे कच्चे रसायन व तयार गावठी दारु जप्त करुन त्याचा नाश केला आहे. या कारवाईने श्रीरामपूरातील बेकायदा धंदेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांची पळापळ सुरु झाली आहे.
दोनच दिवसांपूर्वी 29 ऑगस्टरोजी उपअधीक्षक मिटके यांच्या पथकाने गोंधवणी शिवारात अशाच पद्धतीने कारवाई करतांना पाच जणांवर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन 2 लाख 13 हजार रुपयांचे दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार दारु जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली होती. ‘त्या’ कारवाईच्या चर्चा सुरु असतांनाच आज पुन्हा त्यांच्या पथकाने तालुक्यातील टाकळीभान परिसरातील बेकासदा गावठी दारु निर्मितीचे अड्डे उध्वस्थ केल्याने अवैध धंदेवाईकांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. या कारवाईचे श्रीरामपूरातून स्वागत होत आहे.