कोपरगावला हक्काचे पाणी न मिळाल्यास अधिवेशनावर मोर्चा ः भवर कालवा सल्लागार बैठकीवर संजीवनी पतसंस्थेत पत्रकार परिषद

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
लोकप्रतिनिधींनी मन मोठे करत निळवंडे व पाच नंबर तळ्यातील पाणी शहरातील नागरिकांना मिळवून द्यावे. तसेच कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांना हक्काच्या पाण्याचे महिन्याच्या एक तारखेला आवर्तन मिळाले नाही तर अधिवेशनात मोर्चा नेत आंदोलन व येथेही आंदोलन करू, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांनी दिला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी व भाजप शेतकरी यांच्यात झालेल्या गदारोळावरून भाजपच्यावतीने बुधवारी (ता.1) संजीवनी पतसंस्थेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात भवर बोलत होते. यावेळी सुनील देवकर, भाजप तालुकाप्रमुख साहेबराव रोहोम, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, कैलास माळी, अशोक भाकरे, ज्ञानेश्वर परजणे, फकीरराव बोरणारे, कैलास संवत्सरकर, वेणूनाथ बोळीज, विकास मोरे, नानासाहेब थोरात, बद्रीनाथ सांगळे, रामदास शिंदे, महेश जोशी आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

केशव भवर म्हणाले की, शेतकर्यांनी रब्बीला 3 आवर्तन व 4 उन्हाळी आवर्तन अशी मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली असता 1 डिसेंबरला मागणी केलेले आवर्तन हे 1 जानेवारीला देणार असे अधिकार्यांनी जाहीर केले. मात्र शेतकर्यांना गहू पेरणीला पाण्याची गरज असून शेतकर्यांनी पेरण्या कधी करायच्या असा सवाल उपस्थित केला आहे. तालुक्यातील शेतकर्यांचे लोकप्रतिनिधी यांना काही घेणं नाही थातुरमातूर बैठक घेण्याचा घाट घातला होता. शेतकर्यांना बैठकीत बोलू दिले नाही व लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर अधिकार्यांना उत्तरे देऊ दिले नाही. 2014 ते 2019 पर्यंत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाटपाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले होते. मात्र दोन वर्षांत कोणतेही नियोजन झालेले नाही. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी वाया दाखवत आहे. मात्र सत्य परिस्थिती वेगळी असून आमच्या मागण्या मान्य न करता त्यांनी त्यांच्या प्रमाणे बैठक घेतली. आवर्तनाच्या तोट्याबाबत आम्ही विचारत असताना त्यांना शेतकर्यांचे घेणे नाही, पाणी कुठे जिरते आहे हे संशोधन होणे गरजेचे आहे.

तसेच कालव्याला पाणी चालू असताना कोपरगाव शहरात पाणी मिळणार नाही म्हणून भोंगा फिरत होता, असा अनागोंदी कारभार अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सुरू आहे. तालुक्याच्या आमदारांना साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यांनी कोपरगावकरांसाठी मोठे मन करून निळवंडेचे पाणी आणावे, आम्हाला निळवंडे व पाच नंबर तळ्याचे पाणी देखील द्यावे, असेही भवर म्हणाले.
