… आणि पोलीस ठाण्यातच सुरु झाला रामनामाचा घोष! आव्हाडांच्या वाचाळवाणीला विरोध; दोन तासानंतर झाली कार्यकर्त्यांची सुटका
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी एका सार्वजनिक सोहळ्यासाठी संगमनेरात आलेल्या माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. या गदारोळात प्रचंड घोषणाबाजी करीत काहींनी कार्यक्रमस्थळाकडेही कूच केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आव्हाडांना होणारा विरोध मावळला असे वाटत असताना कार्यकर्त्यांच्या दुसर्या समूहाने गनिमीतंत्राचा वापर करुन सायखिंडी फाटा आणि संगमनेर महाविद्यालयाजवळ त्यांच्या ताफ्यावर अंडी आणि टोमॅटोचा मारा केलाच. या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी एकूण साठाहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जवळपास दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मात्र कार्यकर्त्यांनी तेथेही ‘जय जय राम..’चा घोष सुरु केल्याने एव्हाना पोलीस ठाण्यातून येणार्या चित्रविचित्र आवाजांच्या जागी रामनामाचा घोष ऐकून रस्त्याने जाणारेही काहीक्षण थबकून आश्चर्यचकित झाल्याचे बघायला मिळाले.
रविवारी (ता.७) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतिचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीलाल, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होते. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्यावतीने शिर्डीत दोन दिवसांचे ‘मंथन’ शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या शुभारंभाच्या भाषणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन या शिबिराचा नूरच पालटला.
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर सायंकाळी माध्यमांनी आव्हाड यांना सकाळी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी सकाळी शिबिरात केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करीत त्यावर आपण ठाम असल्याचे ते म्हणाले. त्यांची हीच भूमिका हिंदुत्त्वववादी कार्यकर्त्यांसह असंख्य रामभक्तांच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्या संगमनेरातील दौर्याला विरोध होणार हे निश्चित होते. पोलिसांच्या गोपनीय विभागानेही वेगवेगळ्या प्रकारे विरोध होण्याची दाट शयता वर्तविली होती. त्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच कार्यक्रमस्थळासह संपूर्ण शहरात व अगदी नाशिककडे जाणार्या महामार्गावरही जागोजागी बंदोबस्त तैनात केला होता.
सुरुवातीला सकाळी बाराच्या सुमारास बसस्थानकाजवळ आव्हाड यांच्या निषेधार्थ रास्ता रोको केल्यानंतर कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी काही हिंदुत्त्वववादी कार्यकर्त्यांनी जाणता राजा मैदानाकडे जाण्याचा व तेथे घोषणाबाजीचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या सगळ्यांना आशीर्वाद पतसंस्थेजवळच रोखून सर्वांना ताब्यात घेत पोलीस वाहनांमधून पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे आव्हाडांना आता विरोध करायला कोणी राहिले नाही असा समज करुन घेत पोलीस काहीसे निवांत झाले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जवळपास साठ कार्यकर्त्यांनीही ठाण्यातच ठिय्या मांडून टाळ्यांच्या गजरात रामनामाचा घोष सुरु केला. पोलीस ठाण्यातून सामूहिकपणे कानी येणारा रामघोष रस्त्याने जाणार्यांनाही तोंडात बोटं घालण्यास भाग पाडणारा ठरला.
मुख्य कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर सुटलो एकदाचे असे म्हणतं पोलीस काहीसे निवांत होत असतानाच जितेंद्र आव्हाड यांच्या नाशिककडे निघालेल्या वाहनांच्या ताफ्यावर संगमनेर महाविद्यालयाजवळ अंडी व टोमॅटो फेकण्यात आले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर सदरचा ताफा सायखिंडी फाट्याजवळ पोहोचला असता तेथील गतीरोधकांमुळे ताफ्यातील वाहनांची गती अतिशय संथ झाल्याने आधीपासूनच तेथे दबा धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांनी अचानक उसळी घेत जितेंद्र आव्हाड यांचे वाहन लक्ष्य केले आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच त्यावर अंडी आणि टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर पोलिसांनी पाठलाग करीत आणखी काहींना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.
यावेळी मागे राहिलेल्या कार्यकर्त्यांनी मोहीम फत्ते केल्याचे सुरुवातीला ताब्यात घेतलेल्यांना कळाल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी पुन्हा एकदा रामनामाचा घोष सुरु झाल्याने दुपार नंतरच्या जवळपास दोन तासांहून अधिक वेळ शहर पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर रामनामाच्या गजरात अक्षरशः बुडून गेला होता. रात्री उशिरापर्यंत या अनोख्या निषेध आंदोलनाची आणि पोलीस ठाण्यातील भजनांची शहरातील कट्ट्याकट्ट्यावर चर्चा रंगली होती.