‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले संगमनेरपर्यंत..! महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना संगमनेरातून अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर युनिटने आज भल्या पहाटे संगमनेरात छापा घालीत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. या कारवाईनेे पेपरफुटीचे धागेदोरे थेट संगमनेरात पोहोचले असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पुणे पोलिसांनी डेरे यांच्यासह जीए टेक्नॉलॉजीचा प्रमुख अश्‍विनकुमार यालाही बेंगळुरु येथून अटक केली आहे, त्यामुळे या बहुचर्चीत प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.


पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर आलेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने 2017 साली परीक्षांसंबंधी करार केला होता, त्यावेळी सुखदेव डेरे हे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. 2018 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जीए टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीच्या सल्लागार समितीत कार्यरत होते हे विशेष. पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या विद्यमान आयुक्तांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता एकामागून एक धक्कादायक नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याच कडीत ज्यांच्या कार्यकाळात या गैरव्यवहाराची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या सुखदेव डेरे यांना आता अटक झाली आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यताही आता निर्माण झाली आहे.


पुणे पोलिसांनी सुखदेव डेरेे यांना संगमनेर येथून अटक केल्यानंतर जीए टेक्नॉलॉजीचे या कंपनीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही बेंगळुरु येथून अटक केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 2017 पासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षांसंदर्भात करार झाल्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे 2017 पासून भरती झालेले सर्वच उमेदवार आता पोलिसांच्या रडारवर आहेत.


सोमवारी (ता.20) टीईटी गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची मुलगी आणि जावयाच्या मित्राच्या घरी घातलेल्या छाप्यात एक कोटी 58 लाखांची रोकड व दागिने जप्त करण्यात आले होते. या गैरव्यवहार प्रकरणात सुपे तसेच तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना यापूर्वीच अटक झाली होती. न्यायालयाने त्यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुपे यांच्या अटकेनंतर सुरुवातीला त्यांच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी संजय शाहूराव सानप या आणखी एकाला बीड जिल्ह्यातील वडझरी-पाटोदा येथून अटक केली.


परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून सुरुवातीला 88 लाख 49 हजारांची रोकड, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने तसेच पाच लाख 50 हजार रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या जप्त करण्यात आल्या होत्या. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारात सुपे यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा संपत्ती जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या कारवाईनंतर सुपे यांना अटकेच्या दिवसापासून निलंबित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा आदेश अमलात असेपर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबनावस्थेत त्यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही असेही शासनाने बजावले आहे.

आजी-माजी आयुक्तांचे संगमनेर कनेक्शन..
परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना अटक झाल्यानंतर आता माजी परीक्षा परिषद आयुक्तही गजाआड गेले आहे. ते संगमनेर तालुक्यातील काकडवाडीचे रहिवासी आहेत. मात्र त्याचवेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून परीक्षा परिषदेचे विद्यमान आयुक्त व या गैरव्यवहारात आत्तापर्यंत मुख्य सूत्रधार समजले जाणारे तुकाराम सुपे यांचेही संगमनेर कनेक्शन आहे. सन 1993 ते 1996 या कालावधीत सुपे हे संगमनेरच्या अध्यापक महाविद्यालयात (डि.एड्.कॉलेज) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटक झालेले आजी आणि माजी आयुक्तांचे संगमनेर कनेक्शन हा योगायोगच ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *