मंत्री शंकरराव गडाखांचा मुख्यमंत्र्यांसोबतच राहण्याचा निर्धार शिंदे गटाकडून अनेकदा संपर्क; न जाण्यामागे आजारपणाचे कारणही उपयुक्त
नायक वृत्तसेवा, नेवासा
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात एका पाठोपाठ एक आमदार आणि मंत्रीही गेले असताना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आदित्य ठाकरे एकटेच मंत्री उरले आहेत. तर शिवसेनेला पाठिंबा दिलेल्यांपैकी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हेही एकटचे मंत्री उरले आहेत. त्यांनाही सुरवातीच्या काळात शिंदे गटाकडून अनेकदा संपर्क झाला. मात्र, त्यांनी नकार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्धार केला असल्याचे सांगण्यात आले. अर्थात त्यांना त्यासाठी आजारपणाचे कारणही उपयुक्त ठरल्याचे सांगण्यात येते.
शिवसेनेसोबत असलेले तब्बल 9 मंत्री आतापर्यंत शिंदे यांच्या गटात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता गडाखांच्या भूमिकेची चर्चा होत आहे. ते अद्यापपर्यंत ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या आधीच गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. मधल्या काळात पहाटेचा शपथविधीचा प्रसंग घडला. त्याहीवेळी गडाख यांनी आपली भूमिका न बदलता ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेनेसाठी मोठ्या कसोटीचा काळ आला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले, ठाकरे कुटुंबियाच्या जवळचे मानले जाणारे अनेक जण अशा काळात ठाकरे यांना सोडून गेले. मात्र, अलीकडेच ठाकरे यांच्यासोबत आलेल्या गडाख यांनी अद्यापही त्यांच्यासोबतच राहणे पसंत केले आहे.
विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि थेट रुग्णालय गाठले. त्यानंतर काही वेळातच बाहेर या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. तेव्हा गडाख रुग्णालयात होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ते मुंबईतच विश्रांती घेत आहेत. मधल्या काळात ही फाटाफूट सुरू असताना शिंदे गटाकडून गडाख यांनाही अनेकदा संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांनी त्यांच्या गटात जाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. सर्वांत आधी शिवसेनेला पाठिंबा देणारे गडाखच होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले. अशी पदे इतरांनाही मिळाली, तरीही ते सोडून गेले आणि गडाख मात्र अद्यापर्यंत सोबत आहेत.