समन्यायी पाणी वाटपाच्या कचाट्यातून यंदा झाली सुटका! पावसाची सर्वत्र उघडीप; मात्र जायकवाडी जलाशय भरण्याच्या मार्गावर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेपटाकडील महाकाय जायकवाडी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचल्याने डोक्यावरील धरणांमधून आता अतिरीक्त पाणी सोडण्याच्या नियमातून यंदा सुटका झाली आहे. त्यामुळे गोदावरील उर्ध्व भागातील बळीराजाच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटल्याचे चित्र दिसू लागले आहे. जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांवर पोहोचेपर्यंत वरील धरणात आवक होत असलेल्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडावे लागते. 30 सप्टेंबररोजी गोदावरील खोर्‍यातील धरणांचे पाणीसाठे मोजले जातात व त्यानंतर खालच्या धरणातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी वरच्या धरणातून पाणी सोडावे लागते. समन्यायी पाणी वाटपाच्या या नियमामुळे यापूर्वी तीनवेळा अहमदनगर व नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष उभा राहिला होता. यंदा मात्र जुलैतच मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने गोदावरीच्या उर्ध्व भागातील सर्व धरणांची स्थिती अतिशय समाधानकारक आहे. त्यातच जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठाही आता 89 टक्के झाल्याने व धरणात पाण्याची आवक सुरुच असल्याने यावर्षी 103 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा महाकाय जलाशय तुडूंब होणार आहे.

सन 2005 साली राज्य विधीमंडळाने बहुमताने समन्यायी पाणी वाटपाचा कायदा मंजूर केला. मात्र त्यातील तरतुंदीसह त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी 2012 साल उजेडले. त्यावर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. मराठवाड्यातील अवस्था तर इतकी भीषण होती की असंख्य शेतकर्‍यांची दुभती जनावरं अन्नपाण्यावाचून तडफडू लागली होती. अशावेळी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता या दोन्ही जिल्ह्यातून शासनाच्या निर्णयाला कोणताही विरोध झाला नाही. मात्र त्यानंतर 2014 व 2018 साली पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाल्याने त्यावेळी मात्र या कायद्याला विरोध करीत या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठीचा हा संघर्ष कायम होत राहील हे देखील स्पष्ट झाले होते.


यावर्षी मात्र प्रदीर्घ ओढ दिल्यानंतरही मान्सूनने सर्वत्र चैतन्य निर्माण केले आहे. गोदावरी उर्ध्व खोर्‍यातील सर्वच उपनद्यांच्या पाणलोटात गेल्या पंधरा दिवसांत तुफान जलधारा कोसळल्याने जवळजवळ सर्वच धरणांची स्थिती अतिशय समाधानकारक अवस्थेत पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरुण समूहांसह नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातूनही जायकवाडीत गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहील्याने आज सकाळी 6 वाजता जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 91 हजार 15 दशलक्ष घनफूट (89.10 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 65 हजार दशलक्ष घनफूटावर (84.90 टक्के) पोहोचला आहे. सध्या धरणातून 1 हजार 889 क्यूसेकचा विसर्ग सुरु असून गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीच्या दिशेने 21 हजार 263 क्यूसेकचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे यंदा जायकवाडी तुडूंब भरणार आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिमेकडे सुरू असलेल्या तुफान पावसाने मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही धरणांना समाधानकारक स्थितीत पोहोचवले आहे. गेल्या 48 तासांपासून टप्प्याटप्प्याने पावसाने जोर आता जवळपास ओसरला असून अधुनमधून कोसळणार्‍या आषाढसरी वगळता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. सध्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 85.65 टक्के असून धरणातून 2 हजार 377 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा 81.33 टक्के असून आज सकाळी 6 वाजता धरणातून 4 हजार 246 क्यूसेक पाणी सोडले जात होते. सकाळी 9 वाजता संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्‍यावरुन जायकवाडीच्या दिशेने 5 हजार 711 क्यूसेक पाणी वाहत होते.

जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरणाही जुलैतच सुस्थितीत पोहोचले असून धरणातील पाणीसाठा आता 67.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. सकाळी सहा वाजता कोतुळजवळील मुळा नदीपात्रातून धरणाच्या दिशेने 4 हजार 429 क्यूसेकने पाणी वाहत आहे. आढळा नदीपात्रातूनही सध्या 361 क्यूसेक तर म्हाळुंगी नदीतून 540 क्यूसेक पाणी वाहत आहे. गेल्या चोवीस तासांत घाटघर येथे 32 मि.मी., रतनवाडीत 29 मि.मी., भंडारदरा येथे 17 मि.मी., वाकी येथे 11 मि.मी. व निळवंडे येथे तीन मि.मी., पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 17 हजार 580 दशलक्ष घनफूट, भंडारदरा 9 हजार 455 दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणाचा पाणीसाठा 6 हजार 773 दशलक्ष घनफूट झाला होता.

Visits: 174 Today: 1 Total: 1417521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *