मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा
मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असतानाही मागील 60 वर्षांत नोकरीत समाविष्ट करण्यात आले नाही. शासकीय सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुळा धरणग्रस्तांनी दिला आहे. कृती समितीचे उपाध्यक्ष ठकाजी बाचकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असतानाही गेल्या 60 वर्षांपासून शासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. यापासून मुळा धरणग्रस्तांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले तरी, प्रकल्पग्रस्तांच्या नेमणुकीचे तत्कालीन धोरणे विचारात घेऊन शासन निर्णयामधील तरतुदीनुसार शासकीय नोकरी उपलब्ध करून वर्ग 3 व वर्ग 4 व महात्मा फुले कृषी विद्यापिठात तरतुदीनुसार सेवेत सामावून घ्यावे.

अन्यथा नेवासा तालुक्यातील पानेगाव, करजगाव, अमळनेर, निंभारी, वाटापूर, गोमळवाडी, तामसवाडी या ग्रामपंचायतींचा येणार्या सर्व निवडणुकींवर बहिष्कार टाकणारा ठराव ग्रामसभेत मंजूर झालेला आहे. तरी पुढील काळात काही ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर होणार आहे. तरी शासन दरबारी न्याय मिळवून द्यावा. यावेळी योगेश्वर कोळवे, किरण वरकडे, शशीकांत शेडगे, लिंबाजी होडगर, नानासाहेब होडगर, गीतारामबाचकर, ज्ञानदेव बाचकर, गोरक्ष बाचकर, सुनील वडितके, अनिल डोईफोडे, संदीप डोईफोडे, बाबासाहेब बाचकर, दादासाहेब कोळेकर, राहुल पिसाळ, घोषिराम बाचकर, लखन बाचकर, ज्ञानदेव गलांडे आदी उपस्थित होते.
