वळण येथे डेंग्यू रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ.. नागरिक भयभीत; आरोग्य यंत्रणेने मोहीम राबविण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वळण येथे जीवघेण्या डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः लहान मुले डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त आहेत. थंडी-ताप-उलट्या, पांढर्या पेशी कमी होणे अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. वळण परिसरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शासनाच्या आरोग्य यंत्रणेने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात वळण, मांजरी, मालुंजे खुर्द येथे आरोग्य उपकेंद्रात आहेत. परंतु, मागील अनेक महिन्यांपासून निवासी आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या आरोग्य उपकेंद्रांच्या सुसज्ज इमारीती बहुतांश वेळा कुलूपबंद स्थितीत आढळतात. आरोग्यसेविका नसल्याने वैद्यकीय अधिकारी औपचारिक हजेरी लावून गायब असतात. वळण येथे निवासी आरोग्य सेविकेची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली. तेव्हापासून वळण आरोग्य उपकेंद्राची इमारत शोभेची झाली आहे. पूर्व भागातील सरकारी आरोग्य उपकेंद्र व्हेंटिलेटरवर गेले आहेत.
या उपकेंद्रांमध्ये रिक्त असलेल्या निवासी आरोग्य सेविकांची तत्काळ नियुक्ती करावी. शासकीय आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करावी. डेंग्यूचा फैलाव रोखावा. साथीच्या आजारावर तत्काळ उपचार व्हावेत. साथीचे आजार तत्काळ नियंत्रणात आणावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वळण, मांजरी, मालुंजे खुर्द येथे आरोग्य उपकेंद्रात मंगळवारी (ता.3) भेट देऊन, आरोग्य अधिकार्यांशी संवाद साधला. डेंग्यूसदृश्य व इतर साथीच्या आजारांचा फैलाव झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. तरी, आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. घरोघरी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– डॉ.दीपाली गायकवाड (तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी)