माझ्याकडे का बघतो म्हणत एकावर चाकूने हल्ला! शहरात दहशत निर्माण करणार्‍याला पोलिसांकडून अटक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय वर्दळीचा परिसर म्हणून गणला जाणार्‍या पाटील चावडीजवळ सोमवारी धक्कादायक घटना घडली आहे. शहरात राहणारे दोघे तरुण या परिसरात उभे असतांना अचानक समोरुन आलेल्या एका गुंडाने ‘माझ्याकडे का बघतो’ असे दरडावतांना त्यातील एकाची गचांडी पकडून त्याच्या दंडावर चाकूसारख्या प्राणघातक हत्याराने हल्ला केला. अचानक घडलेला हा प्रसंग कोणाच्या लक्षात येण्यापूर्वीच संबंधित गुंड तेथून पसार झाला. या घटनेत वाडेकर गल्लीत राहणारा तरुण जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मोगलपुर्‍यातील अनाश कलीम शेख याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला सोमवारीच गजाआड करण्यात आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.22) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अतिशय गजबजलेल्या चावडी चौकात सदरची घटना घडली. शहरातील वाडेकर गल्ली भागात राहणारा शिवाजी विकास भोंडगे (वय 21) हा त्याचा मित्र साई अविनाश घुले याच्यासोबत कामानिमित्त या परिसरात आला होता. यावेळी एका बाजूला उभे राहून भोंडगे एकडेतिकडे बघत असतांना समोरुन अचानक एकजण त्याच्या अंगावर धावून आला आणि त्याने काही समजण्याच्या आंतच त्याची गचांडी पकडून खिशात ठेवलेले चाकूसारखे धारदार प्राणघातक शस्त्र हातात घेवून त्याच्या दंडावर वार केला.

यावेळी भोंडगे यांच्या दंडातून रक्ताची धार लागलेली असताना तो त्याच्या मित्रासह थेट शहर पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी अंमलदारास घडला प्रकार प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला तत्काळ मलमपट्टी करण्याची सूचना देत ग्रामीण रुग्णालयात पाठविले व त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन मोगलपुरा परिसरात राहणार्‍या अनाश कलीम शेख याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक करुन गजाआड केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये त्रिपुरा येथील कथीत घटनांच्या संदर्भाने जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दरम्यान संगमनेरात एका धर्माच्या पवित्र स्थानाबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करुन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र संगमनेरातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी एकत्रित येवून त्या घटनेचा संयुक्त निषेध करीत अशा प्रकारांना संगमनेरात कोणताही थारा नसल्याचा संदेश दिला होता. त्यानंतर कोणतेही कारण नसताना अनाश शेख नावाच्या गुंडाने केलेला हा प्रकार संगमनेरातील सौहार्दाच्या वातावरणाला गालबोट लावण्यासारखाच असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Visits: 144 Today: 2 Total: 1420067

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *