घारगाव पोलिसांचा असंवेदनशीलपणा चव्हाट्यावर! ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी; बसमधील प्रवाशांनाही तासभर ताटकळवले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखंड निष्क्रियतेची श्रृंखला जोपासणार्‍या तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यातून पुन्हा एकदा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. यावेळी अकोले आगाराच्या बसमधून प्रवास करणार्‍या एका अमराठी भाषिक अल्पवयीन मुलावरुन धक्कादायक प्रकार घडला असून त्याच्यासह पोलीस ठाण्यात गेलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना ठाणे अंमलदाराने अरेरावी करीत अक्षरशः हुसकावून लावले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर काही पत्रकारांनी तेथे धाव घेतल्यानंतर गडबडलेल्या पोलिसांनी ‘त्या’ अल्पवयीन मुलाशी संवाद साधून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो अयोध्येचा रहिवाशी असल्याचे व ओतूर येथील मावशीच्या घरातून पळून आल्याची माहिती समोर आली. सध्या त्याला अहमदनगरच्या बाल सुधार गृहात ठेवण्यात आले असून त्याच्या जन्मदात्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. या प्रकरणात राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाने माणूसकीचे दर्शन घडवले, तर निष्क्रिय घारगाव पोलिसांची लक्तरे मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चीड आणणारा सदरचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.4) दुपारी घारगाव पोलीस ठाण्यात घडला. पुण्याहून घारगावमार्गे अकोल्याकडे निघालेली अकोले आगाराची बस (क्र.एम.एच.40/ए.एन.8742) दुपारी आळेफाटा येथे आल्यानंतर बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी चढले. त्यामुळे महिला वाहकाला प्रत्येक प्रवाशाची तपासणी करुन तिकिटं फाडण्यासाठी विलंब झाला. सदरची बस घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील बोट्याजवळ आली असता पाठीमागील सीटवर एक दहा ते बारा वर्षांचा अल्पवयीन मुलगा बसल्याचे त्यांना आढळले. वाहकाने त्याला त्याच्या पालकांबाबत विचारणा केली असता त्याला मराठी भाषाच समजतं नसल्याचे समोर आले. मात्र त्याच्या तोडक्या बोलण्यातून घारगावचा उल्लेख झाल्याने त्याला तेथे जायचे असेल असे समजून वाहकाने तिकिटाचे पैसे मागितले, मात्र तो रडू लागल्याने त्याच्याकडे पैसे नसतील असे समजून महिला वाहकाने आपल्यातील माणूसकीचे दर्शन घडवित आळेफाटा ते घारगावपर्यंत त्याचे तिकिटं पदरचे पैसे घालून काढले.


अर्थात कोठे जायचे याची कल्पना नाही, खिशात तिकिटासाठी पैसे नाहीत अशा स्थितीत अन्य कोणीही रस्त्यातच बस उभी करुन त्याला खाली उतरवून दिले असतं. या प्रकरणात मात्र महिला वाहकाने संवेदनशीलपणे त्याची विचारपूसही केली. त्यातून तो घारगावचाही रहिवाशी नसल्याचा बोध झाला. त्यामुळे बसमधील अन्य प्रवाशांच्या सूचनेवरुन बसच्या चालक-वाहकाने आपली बस थेट घारगाव पोलीस ठाण्यात नेली. मात्र तेथे जाताच पोलिसांच्या निष्क्रियतेचा अखंड पाट वाहत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला. सुरुवातीला जवळपास अर्धातास कर्तव्यावरील ठाणे अंमलदार मोबाईलवर खासगी बोलत बसला होता. त्यामुळे बसमधील काही ज्येष्ठ नागरिकांनी खाली उतरुन अंमलदाराला प्रकरण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वर्दीचा जोश चढलेल्या अंमलदाराने मागचा-पुढचा विचार न करता ‘त्या’ अल्पवशीन मुलाला घेवून आंत गेलेल्या महिला वाहकासह ज्येष्ठ नागरिकांनाही अरेरावी करीत अक्षरशः पोलीस ठाण्यातून हुसकावतच अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढले.


त्याचवेळी काही प्रवाशांनी मोबाईलवर या घटनेचे चित्रण केले. त्यात संबंधित ठाणे अंमलदार महिला वाहक व ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी करीत असल्याचे व ‘तुम्ही तिकिटं काढलं तर तुम्हीच त्याला आळेफाट्याला नेवून सोडा. आळेफाटा आमची हद्द नाही, तुम्ही त्याला घेवून येथे आलाच कशाला? निघा इथून सगळे..’ असे म्हणत त्यांनी आपली असंवेदशीलताही चव्हाट्यावर आणली. त्याचवेळी पठारावरील काही पत्रकारांनी तेथे धाव घेतली. त्यांना पाहिल्यानंतर सदरील अंमलदाराच्या भाषेत अचानक गोडवा निर्माण झाला. संगमनेरातील एका पत्रकाराने याबाबत थेट घारगावचे ‘कर्तव्यनिष्ठ’ पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून घारगाव पोलीस ठाण्यात घडत असलेला प्रकार संतापजनक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.


आपली राहिलेलीही रस्त्यावर नको यायला असा विचार करुन त्यांनी घाईगडबडीत पोलीस ठाणे गाठून संबंधित अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात थांबवून जवळपास तासभर पोलीस ठाण्याच्या आवारात थांबलेली शासकीय बस आणि त्यातील ताटकळत असलेल्या प्रवाशांची मुक्तता केली. त्यानंतर ‘त्या’ मुलाला विश्‍वासात घेवून त्याची चौकशी केली असता अयोध्या इतकाच शब्द पोलिसांना समजला. त्यातही भाषेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्यात अडथळे येवू लागले. तोपर्यंत पोलिसांनी त्याला अहमदनगरच्या बालसुधार गृहात पाठविण्याची व्यवस्थाही केली होती.


याच दरम्यान घारगाव पोलिसांनी भारतीय पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अयोध्या नियंत्रण कक्षाला या प्रकाराबाबतची माहिती देत सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार अयोध्या पोलिसांनी काही वेळातच घारगावमध्ये आणलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना हुडकून घारगाव पोलिसांशी त्यांचा संपर्क स्थापित करुन दिला. यावेळी त्यांनी आपला मुलगा त्याच्या मावशीकडे ओतूर (ता.जुन्नर, जि.पुणे) येथे राहत असल्याचे कळविल्यानंतर घारगाव पोलिसांनी ओतूर पोलिसांशी संपर्क केला. नेमकं त्याचवेळी सदरील मुलाची मावशी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तेथे हजर होती.


मुलाच्या मावशीला मुलगा सुखरुप असल्याचे समजल्यानंतर त्यांनी घारगावला धाव घेतली. मात्र तो पर्यंत पोलिसांनी सदरील मुलाला अहमदनगरच्या बालसुधार गृहात रवाना केले होते. त्यामुळे त्यांना नगरला जावून मुलाला ताब्यात घेण्याची सूचना करण्यात आली. या प्रकरणातून घारगाव पोलिसांबाबत पुन्हा एकदा संताप निर्माण झाला असून पोलीस ठाणे आपल्या बापाचेच आहे असे समजून महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही अपमानास्पद वागणूक देणार्‍या ‘त्या’ अंमलदारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *