जेथे भयाचे वास्तव्य असते तेथे प्रेम कधीच नसते ः ढोक महाराज तालुक्यातील सावरगाव घुले येथे रामायण कथा महोत्सवाचे आयोजन
नायक वृत्तसेवा, घारगाव
पती आणि पत्नी हे दोघेही संसाररुपी गाड्याची दोन चाके आहेत, त्यातील एकही चाकं मोडले तरी प्रतिष्ठा जाते. मग असा गाडा धुळखात वाड्यासमोर उभा रहातो आणि त्यावर गावची कुत्री येवून बसतात. शास्त्रात पत्नीला अर्धांगीणी म्हणून संबोधले आहे, ती जन्मभर पतीची दासीसमान सेवा करते, कठीण प्रसंगात पतीला मंत्री म्हणून सल्लाही देते आणि थकलेला पती घरी आल्यानंतर त्याला सुग्रास जेवण देवून पोटंभर जेवू घालते. त्यामुळे प्रत्येक संसारी पुरुषाने आपल्या पत्नीचा सन्मान केलाच पाहिजे असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केली. तालुक्यातील सावरगांव घुले येथे सुरु असलेल्या रामायण कथेच्या पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
यावेळी रामायणाचे निरुपण करताना ढोक महाराज पुढे म्हणाले की, जेथे भय असते, तेथे कधीही प्रेम नसते. ज्यात भय नाही त्यालाच प्रेम असं म्हणतात. त्रेता युगातील चार्तुमासात भगवान शंकर स्वतः आपल्या अर्धांगीणीला सोबत घेवून मनमाड जवळील अंकाई किल्ल्यावर आले होते. अगस्त्य ऋषींच्या मुखातून त्या दोघांनीही रामायण कथेचे श्रवण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तेव्हापासूनच पती आणि पत्नीने सोबत येवून कथा श्रवण्याचा प्रघात निर्माण झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
यावर अधिक भाष्य करताना महाराज म्हणाले की, पतीने पुण्या केल्यास त्यातला अर्धा भाग आपोआप पत्नीच्या पदरात जातो. पण पत्नीने पुण्य मिळवल्यास त्यातील कोणताही भाग पतीला मिळत नाही. मात्र पतीने पाप केले तर त्याचे भोग पत्नीला भोगावे लागत नाहीत, परंतु पत्नीने एखादे पाप केले असेल तर त्याचे अर्धे परिणाम पतीला भागावेच लागतात. कारण एखादी स्त्री जेव्हा जेव्हा पत्नी होवून आपल्या पतीच्या घरात पाऊल ठेवते तेव्हा ती आपली रक्ताची नाती-गोती, नाव, गाव आणि सगळं काही पाठीमागे सोडून आलेली असते. म्हणून पत्नीच्या पुण्यात पतीचा वाटा नसतो. हे उदाहरणासह पटवून देताना त्यांनी एखाद्या महिलेचा पती जर शिक्षक असेल तर ग्रामीण भागातील अख्खं गाव त्याच्या पत्नीलाही मास्तरीण म्हणून ओळखतं. परंतु जर एखाद्याची पत्नी शिक्षिका असेल आणि तो शेतकरी असेल तर मात्र कोणीही त्याला मास्तर म्हणून हाका मारीत नाही. याचाच अर्थ पत्नीच्या पुण्यात जसा पतीचा वाटा नसतो, तसा तो तिच्या पदव्यांमध्येही नसतो असा दाखलाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले येथे खंडोबारायांचे जागृत देवस्थान असून दरवर्षी याठिकाणी चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. यावर्षीच्या उत्सवानिमित्ताने विश्वस्त मंडळाने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या ओजस्वी वाणीतून रामायण कथेचे आयोजन केले असून पंचक्रोशीतील शेकडो भाविक याठिकाणी कथा श्रवण्यासाठी हजेरी लावत आहेत. 29 नोव्हेंबर रोजी या कथेची सांगता होणार आहे.