आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकावर दोन कारचा अपघात

आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकावर दोन कारचा अपघात
दैव बलवत्तर असल्याने पाचजण बालंबाल बचावले; दोन्ही कारचे मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकवर दोन कारचा अपघात होवून केवळ दैव बलवत्तर असल्याने पाचजण बालंबाल बचावले असल्याची घटना सोमवारी (ता.5) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.


या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, कार क्रमांक (जीजे.19, एएम.6163) व दुसरी कार क्रमांक (एमएच.15, जीएक्स.9566) या दोन्ही कार सोमवारी संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने जात होत्या. दुपारी दोन्ही कार आंबीखालसा याठिकाणी असलेल्या गतिरोधकवर आल्या असता त्याच दरम्यान एका कारने दुसर्‍या कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पहिल्या कारचा टायर फुटून ती थेट दुभाजकावर चढली. तर दुसरी कार बाजूला गेली. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर असल्याने दोन्ही कारमधील पाच जण बालंबाल बचावले. मात्र अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस कर्मचारी किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण आदिंनी घटनास्थळी धाव घेतली.


अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहनाने महामार्गावरून बाजूला घेण्यात आली. दरम्यान आंबीखालसा येथील गतिरोधकवर पांढर्‍या रंगाचे पट्टे न मारल्याने वरुन येणार्‍या छोट्या-मोठ्या वाहनचालकांच्या लक्षात हा गतिरोधक येत नाही. अचानक वाहनचालकांनी ब्रेक दाबल्यावर अथवा गती कमी केल्यावर हे अपघात होवू लागले आहेत. दिवसाआड अपघात होवू लागल्याने वाहनचालकही वैतागले आहेत. तसेच एकल घाट, डोळासणे, चंदनापुरी घाट आदी ठिकठिकाणी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डा हुकवायच्या नादातही अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या गतिरोधकवर पांढर्‍या रंगाचे पट्टे मारावे व महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांतून होत आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 117297

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *