विश्वास गमावलेल्या चीनला भारतच पर्याय ठरु शकतो : डॉ. देवळाणकर कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ऊहापोह

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनामुळे आपल्या देशात दोनवेळा लॉकडाऊन करावा लागला, त्या कोरोनाचा संबंध आंतराष्ट्रीय राजकारणाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडित आहे. कोरोनाचा उगम चीनच्या व्युहान शहरातून झाल्याचे सर्वश्रृत आहे. कोरोनाचा हा प्रकार चीनच्या जीवशास्त्रावर (जैविक अस्त्र) आधारित असून कोरोनासारखे अनेक विषाणू चीनकडे आहेत. कोरोनाच्या संक्रमणातून जगावर आपण राज्य करु शकतो असा संदेशच चीनने आपल्या कृतीतून अवघ्या जगाला दिल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.


कवी अनंत फंदी व्याख्यानेमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘भारत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा पतसंस्थेचे चेअरमन डॉ.योगेश भुतडा, उद्योगपती राजेश मालपाणी, कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख अरुण ताजणे, जसपाल डंग, अनिल राठी आदी उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना देवळाणकर म्हणाले की, अफगानिस्तानात सत्ता काबिज कणारे तालिबानी आणि भारताच्या जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशत निर्माण करणार्‍या अतिरेकी संघटना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे अफगानिस्तानातील बदलत्या स्थितीचा भारतावरही परिणाम होणार आहे. जगभरात घडणार्‍या घडमोडी आणि त्या अनुषंगाने जागतिक संघटनांच्या भूमिका याद्वारे भारताने आपली ताकद दाखवून दिल्याने संपूर्ण जग आज आशाळभूत नजरेने भारताकडे पहात आहे. आपला देश जगातील पाचव्या क्रमांची अर्थव्यवस्था असून 2022 पर्यत भारताच्या विकासाचा दर (जीडीपी) सात ते आठ टक्क्यांवर असेल. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाचे संकट ओढावले नसते तर भारत आज जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असता, मात्र यापुढील काळात देशाच्या प्रगतीचा वेग कोणीही रोखू शकणार नाही असे स्पष्ट मत देवळाणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या देशातील उद्योगधंद्यांची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याची गरज आहे. त्यासोबतच भारतीयांनी स्वदेशी उत्पादनाचा वापर करण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या काळात जगातील सर्वच देश गोंधळलेले असताना भारताने कोव्हिशिल्ड लस तयार करुन जगभरातील अनेक गरीब देशांना ती पाठविली. त्यामुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा तयार झाली असून त्यातून परस्पर संबंध अधिक मजबूत बनले आहेत. जगातील अनेक देशांना भारताने मोठी मदत केली आहे. त्यामुळे यापुढील काळात भारताच्या प्रगतीचा अश्व कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अफगानिस्तानातील तालिबानी राजवटीतील अनेक मंत्री आंतराष्ट्रीय दहशतवादी आहेत. त्यांचा भारताला धोका असल्याचे सांगितले जात असले तरीही भारताने तेथील नागरिकांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. दुसरीकडे चीनचा सामना करण्यासाठी भारताने अमेरिकेशीही मैत्रिचे संबंध निर्माण केले आहेत. येथून पुढील काळात कोणीही कोणावर विसंबून राहू नये हे कोरोनाने संपूर्ण जगाला शिकविले आहे. कोविड संक्रमणातून चीनने जागतिक पातळीवर आपली विश्वासार्हता गमावली आहे, त्याचवेळी संक्रमणाचे बळी ठरलेल्या अनेक छोट्या आणि गरीब देशांना लशींचा पुरवठा करुन भारताने मानवतेचे दर्शन घडवितांना यासर्व देशांशी मैत्रिचे संबंध निर्माण केल्याने चीनला पर्याय म्हणून अवघे जग आज भारताकडे पाहू लागल्याचे स्पष्ट मतही शैलेश देवळाणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Visits: 67 Today: 2 Total: 313106

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *