पाच दुचाकींसह सहा चोरट्यांना केली अटक कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव शहर पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकींसह सहा चोरट्यांना अटक केली आहे. तिघे पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ब्राह्मणगाव येथील सागर धनशीराम पंडोरे यांनी दुचाकी (क्र.एमएच.१७, सीजी.११३४) चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना गुप्त बातमीदारामार्फत समजले की, चोरीचे वाहन सिन्नर येथे विकलेले आहे. त्यानुसार पथकाने सिन्नरला जावून संशयित आरोपी व दुचाकीचा शोध घेत गणेश जेजूरकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदार दिनेश राजेंद्र आहेर व अजित कैलास जेजूरकर यांच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे सांगितले. तिघांकडेही दुचाकी चोरींची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

सदर चोरीची वाहने शिरपूर (जि.धुळे) येथे विकल्याचे सांगितले. त्यावरुन प्रवीण सुका कोळी, प्रमोद झुंबरलाल कोळी व हर्षल राजेंद्र राजपूत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तपासाच्या अनुषंगाने दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक करुन पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांपैकी चोरट्यांनी कोपरगाव शहर हद्दीतून दोन, ग्रामीण हद्दीतून दोन आणि येवला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चोरल्या असल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत दाते, पोहेकॉ. डी. आर. तिकोणे, पोना. ए. एम. दारकुंडे, पोना. महेश गोडसे, पोकॉ. जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मासाळ, एम. आर. फड, बाळू धोंगडे, राम खारतोडे, जी. व्ही. काकडे यांनी केली आहे. या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
