‘डॉ. विशाखा शिंदे यांचा गुन्हा काय?’; समाज माध्यमांत भावनिक पोस्ट व्हायरल महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. विशाखा शिंदे यांच्या विषयीच्या पोस्ट सध्या समाज माध्यमांतून व्हायरल होत आहेत. यात डॉ. शिंदे यांनी काय गुन्हा केला, असा सवाल विचारून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्या शिकाऊ डॉक्टर असल्याने डॉक्टरांच्या संघटनाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 6 नोव्हेंबर रोजी आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला होता. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. यात वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे तसेच स्टाफ नर्स सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंत यांचा समावेश आहे. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या सर्वजणी न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंदे यांचा गुन्हा काय, असा सवाल करणारी ही पोस्ट व्हायरल होत आहे. पोलिसांनी मात्र अटक करण्यात आलेल्यांविरूद्ध पुरेसा पुरावा असल्यानेच कारवाई केल्याचा दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, रुग्णालयातून मिळालेली कागदपत्रे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. विशाखा शिंदे या अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे अस्थीरोग विभागात पदव्युत्तर पदविका करणार्या शिकाऊ डॉक्टर आहेत. आगीच्या कारणाचा शोध पोलीस यंत्रणा करत आहे. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. विशाखा त्यादिवशी या विभागात कर्तव्यावर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी कर्तव्यावर असणार्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा यांना दोषी ठरवले गेले. आरोग्य विभागाने यांना निलंबित केले तर पोलीस विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.
निलंबित केल्याच्या तिसर्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. परंतु पोलीस विभागाने मात्र त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि डॉ. विशाखा यांच्या अडचणींत वाढ झाली. त्या आजतागायत कोठडीमध्ये आहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स (मार्ड) ही महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची सगळ्यात मोठी संघटना आहे. तीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.