ग्रामविकास मंत्र्यांनी सभापती संगीता शिंदेंचा अर्ज फेटाळला गुरुवारी निवडणूक प्रक्रिया; डॉ. वंदना मुरकुटे होणार सभापती?
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
जिल्हाधिकार्यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती मिळावी म्हणून सभापती संगीता शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अपील केले होते. मात्र जिल्हाधिकार्यांनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची बाब या न्यायधिकारणाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे नमूद करून ग्रामविकास मंत्र्यांनी शिंदे यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी जाहीर केलेला सभापतीपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी (ता.18) होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.
पंचायत समितीच्या विद्यमान सभापती संगीता शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकार्यांकडे दाखल केली होती. ज्यात जिल्हाधिकार्यांनी डॉ. मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यामुळे डॉ. मुरकुटे यांचा सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात शिंदे यांना ग्रामविकास मंत्र्यांकडे दाद मागता येवू शकते, असेही जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या निर्णयात नमूद केले होते.
त्यानुसार शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती द्यावी अशा आशयाचा अर्ज दाखल केला होता. त्यानुसार बुधवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निर्णय दिला की, जिल्हाधिकार्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्याची बाब या न्यायधिकारणाच्या कार्यकक्षेत नसल्याने अर्जदार संगीता शिंदे यांचा श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीस स्थगिती देण्याबाबतचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांच्यावतीने अॅड. दत्तात्रय घोडके, अॅड. अजित काळे व अॅड. समीन बागवान यांनी काम पाहिले.
श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक गुरुवारी (ता.18) होत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळमर्यादा सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या उमेदवारी अर्जाची छाननी दुपारी 2 ते 2.15 वाजता तर उमेदवारी अर्ज माघार दुपारी 2.15 ते 2.30 यावेळेत राहणार असून सभापतीपदासाठी निवडणूक दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.