वांबोरी ग्रामस्थांची खड्ड्याला रांगोळी काढून गांधीगिरी रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी गावात प्रवेश करणारा मुख्य नगर-वांबोरी रस्त्यावर नगरवेस समोरील करपरा नदीच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी या खड्ड्याला रांगोळी काढून विधीवत पूजन करून नारळ वाढवून गांधीगिरी केली. रस्त्याचे काम तत्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील वांबोरीचे माजी उपसरपंच राजेंद्र पटारे यांनी दिला.

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामध्ये यंदा प्रमाणापेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी, नाले, तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत. त्यातच मागील महिन्यामध्ये अचानक झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने वांबोरीतील करपरा नदीला अचानक पूर आला. या पुरामुळे वांबोरीतील नगरवेस परिसरातील नदीवर बांधलेल्या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. राहिलेल्या अर्ध्या रस्त्यातही खोल खड्डे पडले. त्यामुळे हा पूल वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय धोकादायक बनला असून या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार नागरिकांमधून होत असून याविषयी प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सोमवारी (ता.15) वांबोरी ग्रामस्थांनी या पुलावरील खड्ड्यांचे विधीवत पूजन करून गांधीगिरी केली. गावातील वाहतुकीसाठी नगर वेशीतून वांबोरी गावात प्रवेश करण्यासाठीचा मुख्य व महत्त्वाचा रस्ता आहे. गावासह परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी अमरधाम तसेच मुस्लीम कब्रस्तानकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री अंत्यविधीसाठी जाणार्‍यांची या पुलाच्या दुर्दशेमुळे मोठी गैरसोय होत असून या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या अगोदरही रात्री-अपरात्री या खड्ड्यांमध्ये अनेकवेळा दुचाकी व चारचाकी पडून अपघात घडले आहेत. परंतु अशीच परिस्थिती राहिल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा वांबोरी ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे अर्धनग्न आंदोलन छेडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच राजेंद्र पटारे यांनी दिला. या आंदोलनात श्रीसंत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, चर्मकार विकास संघाचे पोपट वाघ, बाबासाहेब मुळे, बाळासाहेब कुर्‍हे, तन्वीर मंसुरी, रंगनाथ जाधव, शेख अजीम, खंडू तिडके, जावेद शेख, अब्रार शेख, असद मंसुरी, पाटीलबा पटारे, साहिल शेख, काशिनाथ बनकर आदी उपस्थित होते.

Visits: 165 Today: 1 Total: 1111078

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *