पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना ‘कंट्रोल’ जमा करा! पठारावरील नागरिकांची मागणी; अवैध धंद्यांना पाठबळ असल्याचा गंभीर आरोप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कथीत लव्ह जिहाद प्रकरणाने पठारावरील वातावरण चांगलेच तापले असून पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या विरोधात जनक्षोभ उसळू लागला आहे. खेडकर यांनी घारगावचा पदभार घेतल्यापासून पठारावरील गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून समाजविघातक प्रवृत्तींनाही प्रोत्साहन मिळत आहे. त्यातूनच आंबीखालसा येथील 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन तिच्या धर्मांतराचा प्रयत्न घडला आहे. या संतापजनक प्रकरणात पठारावरील गुटखा तस्करांचा हात असून घारगाव पोलिसांचे त्यांच्याशी हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप करीत येथील संपूर्ण कारकीर्द केवळ लाटण्यातच धन्यता मानणार्या या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांना तत्काळ ‘कंट्रोल’ जमा करावे अशी जोरदार मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या रविवारी (ता.7) पठारभागातील आंबीखालसा येथे राहणार्या एका 19 वर्षीय तरुणीचे घारगाव बसस्थानकावरुन शादाब रशीद तांबोळी याने त्याचे साथीदार ताहीर शेख, जावेद शेख व कुणाला विठ्ठल शिरोळे (सर्व रा.घारगाव) यांच्या मदतीने संघटीतपणे अपहरण केले होते. या सर्वांचा म्होरक्या युसुफ चौगुले असून तो पठारावरील समाजविघातक कृत्यांमध्ये आघाडीवर आहे. पठारभागातील विशिष्ट समाजातील तरुणांना भडकावून तो त्यांच्याकडून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करवून घेत असून त्यासाठी लागणार्या पैशांसाठी या तरुणांना गुन्हेगारी कृत्य व अवैध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोपही पठारावरील नागरिकांनी निवेदनातून केला आहे.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या कथीत ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात विचार करता घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर यांचा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोणताही वचक राहीला नसल्याचे दिसून येते. त्यातूनच पठारावर यापूर्वी कधीही न घडलेले गुन्हे घडण्यास सुरुवात झाली आहे. खेडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासूनच अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांना पाठबळ मिळाले आहे. तरुणीचे अपहरण करणार्या शादाब तांबोळी याला गुन्हा करण्यास साथ देणारेही गुन्हेगारच असून पठारभागात त्या सर्वांना गुटखा तस्कर म्हणूनच ओळखले जाते. या सर्वांचे कारनामे घारगाव पोलिसांना माहिती असून त्यांच्याच आशीर्वादाने हा उद्योग बिनबोभाटपणे सुरु असल्याचेही या निवदेनात म्हंटले आहे.
पठारभागातील गुन्हेगारी वाढवण्यात ‘दोन’ म्होरके असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या विरोधात बोलल्यास अॅट्रोसिटीची धमकी दिली जात असून यापूर्वी अशाप्रकारे खोट्या तक्रारी दाखल करुन आवाज उठवणार्यांना दडपण्याचे प्रकार घडल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. खेडकर यांची येथील संपूर्ण कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली असून पठारावर दारु, मटका, ताडी, जुगार, हातभट्टी, अवैध वाळू उपसा अशा सगळ्याच गुन्ह्यांना त्यांचे सुप्त पाठबळ आहे. याशिवाय पठारावरील चोरीच्या घटना थांबता थांबत नसून त्यातील एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात हे महाशय आजवर यशस्वी झालेले नाहीत.
सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय असं ब्रीद असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. मात्र संतोष खेडकर सारख्या निष्क्रिय आणि सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अधिकार्यांमुळे या पराक्रमी परंपरेला बट्टा लागत असून त्यातून सर्वसामान्यांच्या मनातील पोलिसांची प्रतिमाही मलिन होत असल्याचा गंभीर आरोप करताना अशा अधिकार्याला नियंत्रण कक्षाशिवाय योग्य ठिकाण असू शकत नसल्याने त्यांना तत्काळ ‘कंट्रोल’ जमा करावे अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर घारगाव आणि पंचक्रोशीतील जवळपास तिनशेहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. संगमनेर तालुक्याचे सामाजिक स्वास्थ बिघडवणार्या घटनेतही पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची भूमिका वादग्रस्तच राहिल्याने आतातरी पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतात की पुन्हा नेहमीप्रमाणे ‘अभय’दान देतात याकडे संपूर्ण पठारासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सुमारे दीड दशकांच्या घारगाव पोलीस ठाण्याच्या इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त आणि निष्क्रिय पोलीस निरीक्षक म्हणून संतोष खेडकर यांची कारकीर्द नोंदवली गेली आहे. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात पठारभागातील अवैध व्यवसायात प्रचंड वाढ झाली असून घारगाव पोलीस ठाण्याला नारळ फोडा आणि वाट्टेल ते करा अशी गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. या महाशयांनी अगदी पारंपरिक यात्रा-जत्रांच्या परवानगीसाठीही ग्रामस्थांकडून सक्तिची वसुली केल्याच्या चर्चा असून संपूर्ण तालुक्याचे सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणार्या कथीत ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातही त्यांची निष्क्रियता ठळकपणे दिसून आली आहे. गेल्या दोन वर्षात पठारभागातील गुन्हेगारी शिगेला गेलेली असताना त्यातील एकाही प्रकरणाचा तपास मात्र लागलेला नाही. तरीही पोलीस अधीक्षकांकडून त्यांना मिळणारे ‘अभय’ सामान्यांच्या मनात कल्लोळ निर्माण करणारे ठरले आहे.