राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर! सन्मानाने जगण्याचा हक्क आणि राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय तुटपुंज्या आणि ते देखील नियमित न मिळणार्‍या वेतनावर कर्तव्य बजावणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील लाखों कर्मचार्‍यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचा परिणाम बसेसच्या वर्दळीने नेहमी गजबजलेली बसस्थानके ओस पडली असून आज सकाळपासून संगमनेरच्या आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही. राज्यभरातील एस.टी. कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी ‘संयुक्त कृती समिती’ची स्थापना करुन त्या बॅनरखाली बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला असून आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगितले आहे. ऐन दिवाळीच्या काळात परिवहन कर्मचारी संपावर गेल्यावर प्रवाशांचे हाल होण्यासह महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे.

एकीकडे वातानुकुलित कक्षात बसून काम करणारे राज्य सरकारचे अधिकारी व कर्मचारी मोठे पगार घेवून सुखाने जगत असतांना सतत तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मात्र आपल्या मासिक वेतनासाठीही वारंवार संघर्ष करावा लागत आहे. अनियमित वेतनामूळे बहुतेक आगारातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी कर्जबाजारी झाले असून त्यातूनच आत्तापर्यंत 29 कर्मचार्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीव संपविले आहे, या उपरांतही राज्य सरकारने महामंडळाच्या कर्मचार्‍यांची दखल न घेतल्याने अखेर राज्यभरातील एस.टी.महामंडळातील कर्मचार्‍यांनी आजपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

नाशिक-पुणे व मुंबई या महानगरीय त्रिकोणी श्रृंखलेत वसलेल्या संगमनेर आगारातही आज सकाळपासून आंदोलनास सुरुवात झाली असून एस.टी.महामंडळ कामगार संघटना, कामगार सेना, इंटक व महाराष्ट्र मोटर कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे ही प्रमुख मागणी घेवून उपोषण करणार्‍या कर्मचार्‍यांनी आम्हाला आमच्या घामाचे पैसे द्या, आम्हाला टक्केवारीच्या तुकड्यांवर जगण्यात रस नाही, आमच्या कामाची किंमत आणि आम्हाला सन्मानाने जगण्याचा हक्क द्या अशी भावनिक सादही राज्य सरकारला घातली आहे.

आजपासून सुरु झालेले आंदोलन म्हणजे एस.टी.कर्मचारी व कामगारांच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. अत्यंत कमी वेतनावर काम करणारा पुरोगामी महाराष्ट्रातील एकमेव कर्मचारी परिवहन महामंडळाचा आहे. सामान्य कुटुंबातील ही मंडळी परिवहन महामंडळाच्या तुटपूंज्या पगारातून कधीही आर्थिक सक्षम होवू शकत नाही. त्यामुळे महामंडळातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचारी आज कर्जबाजारी झाले आहेत. मिळणार्‍या पगारातून एस.टी.चे कर्मचारी आपल्या कुटुंबाच्या गरजा, मुलांचे शिक्षण व वैद्यकीय गरजा भागवू शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही काळात कर्जबाजारीपणाला वैतागून राज्यातील 29 कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे असेही कर्मचार्‍यांच्या संयुक्त समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील लाखों कर्मचार्‍यांनी आजपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, वार्षिक वेतनवाढीचा दर दोनवरुन तीन टक्के करावा, राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता 28 टक्के रुन तो फरकासह द्यावा, सणासाठी 12 हजार 500 रुपयांची उचल व 15 हजार रुपये बोनस दिवाळीपूर्वी अदा करावा, तसेच मान्य केल्याप्रमाणे देय असलेले घरभाडे 7, 14, 21 या सूत्रानुसार न करता 8, 16, 24 नुसार लागू करावे अशा प्रमुख मागण्या घेवून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Visits: 97 Today: 1 Total: 1114453

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *