राज्यातील कृषी विद्यापीठांचे कामकाज कोलमडण्याची शक्यता शासनस्तरावर सेवानिवृत्तीचे वय कमी करणार असल्याची चर्चा

नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादा शासनस्तरावर सेवानिवृत्तीचे 62 हून 60 करण्याची शक्यता असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात जोरदार सुरू आहे. या चर्चेमुळे विद्यापीठातील अनेकांना सेवानिवृत्त होण्याचे तसेच पदोन्नतीचे वेध लागले आहे. वर्ग एक व दोनमधील प्राध्यापक संवर्ग सध्या 62, वर्ग तीनमधील कर्मचारी वयोमर्यादा 58 व वर्ग चारमधील कर्मचारी यांना वय 60 इतकी आहे.

कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली असून प्राध्यापक संवर्गातील अधिकार्यांची निवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्ष करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तांत्रिक कर्मचारी संघटनेने कृषी विद्यापीठांचे कुलपती व राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना दिले आहे. राज्यामध्ये रिक्त पदांमुळे शिक्षकवर्गीय अधिकार्यांवर कामाचा ताण वाढला असून सुमारे 55 टक्के रिक्त पदे असल्यामुळे याचा परिणाम विद्यापीठांच्या विस्तार, संशोधन व शिक्षण या कार्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अनुभवी व पात्रताधारक शिक्षक वर्गीय कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे काही पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर येणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

विद्यापीठाची अधिस्वीकृती तसेच घसरलेले मानांकन पाहता विद्यापीठातील पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. देशामध्ये गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार व इतर काही राज्यांमध्ये कृषी शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा 65 वर्षे आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक संवर्गातील मंजूर पदे 2 हजार 319 आहेत, यामधील सुमारे 1 हजार 100 पदे सध्या रिक्त आहेत व वयोमर्यादा 62 वरून 60 झाल्यास आणखी सुमारे 150 पदे एकाच दिवशी सेवानिवृत्त होऊ शकतात. या पदांमध्ये संचालक, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ तसेच प्राध्यापक अशी अनुभवी व महत्वपूर्ण पदे आहेत. सुमारे 150 अधिकारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाल्यास राज्यातील चारही विद्यापीठे खिळखिळे होऊन मोडकळीस येतील यात शंका नाही. राज्यामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य व गृह खात्यातील हजारो पदे अद्यापही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठातील जागांची भरती कधी होणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका वरीष्ठ अधिकार्याने दिली.
