संक्रमण आटोक्यात येवूनही ऑक्टोबरमध्ये 134 बाधितांचा मृत्यू! पोर्टलवरील नोंदीचा घोळ; वेळेवर नोंदी करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशीच

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण देशात कोविड रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या घटत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र दररोजचा चढउतार अनुभवण्यास मिळत आहे. एकीकडे रुग्णसंख्या घटत असली तरीही ऑक्टोबरच्या 21 दिवसांत जिल्ह्यातील 134 बाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा दिवसांतच एकोणावीस मृत्यू झाल्याचे या नोंदींवरुन दिसून येत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद करण्यास दिरंगाई होत असल्याने एखाद्या दिवशी मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे यापूर्वीही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता राज्यासह जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या कमी झाली असतानाही मृत्यूच्या नोंदी वेळेवर होत नसल्याने जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील अनेक महानगरांसह काही जिल्ह्यातील कोविड रुग्णांसह संक्रमणातून होणार्‍या मूत्यूची संख्या शून्यावर आली आहे. मागील आठवड्यापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील कोविड स्थिती चिंताजनकच होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील दबाव वाढल्याने जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेर, पारनेरसह संक्रमण वाढलेल्या काही तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पुन्हा टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर आले असून गेल्या काही दिवसांपासून दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता झपाट्याने खाली असून आजच्या स्थितीत जिल्ह्यात अवघे 1 हजार 764 सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या महिन्यात जिल्ह्यात दररोज सरासरी सातशे ते आठशे रुग्ण समोर येत होते, त्यात ऑक्टोबरमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी घट होवून आजच्या स्थितीत दररोजची रुग्णसंख्या दोनशे ते तीनशेच्या आत आली आहे. मात्र त्याचवेळी कोविड पोर्टलवर अचानक वाढणारी कोविड मृत्यूंची संख्या चिंता आणि गोंधळ वाढवणारी ठरत आहे. एक ऑक्टोबरला पोर्टलवरील एकूण मृत्यूंची संख्या 6 हजार 851 होती, तर गुरुवारी (ता.21) ती 6 हजार 985 वर पोहोचली. याचाच अर्थ चालू महिन्यातील पहिल्या 21 दिवसांत जिल्ह्यातील 134 कोविड बाधितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते.

गेल्या 21 दिवसांत समोर आलेल्या आकड्यांचे विश्लेषण केल्यास ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात मृत्यूंची संख्या वाढल्याचे दिसून येते. तर त्यानंतर काही दिवस कोविड मृत्यूच्या बाबतीत निरंक असल्याचे दिसते. मात्र, गेल्या सहा दिवसांत मृत्यूचे आकडे पुन्हा वाढल्याचे दिसते. 15 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या 6 हजार 966 होती, 17 ऑक्टोबर रोजी ती स्थिर राहिली. 18 ऑक्टोबरला 6 हजार 972 झाली. 19 ऑक्टोबरला ती कायम राहिली, 20 ऑक्टोबर त्यात पुन्हा वाढ होवून ती 6 हजार 985 वर गेली. तर गुरुवारी (ता.21) ती पुन्हा स्थिर राहीली.

मध्यंतरीच्या काळात खासगी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूच्या नोंदी नंतर केल्या जात असल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे आकडे कमी-जास्त दिसून येतात असे प्रशासनाकडून सांगितले जाते. पूर्वी रुग्णसंख्या अधिक होती. त्यामुळे उपचाराला प्राधान्य देत मृतांच्या नोंदी ठेवण्याकडे खासगी रुग्णालयांकडून उशीर होत होता, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे त्या राहून जात होत्या. मात्र आता रुग्णसंख्या कमालीची घसरलेली असतांना आणि जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झालेली मृत्यूच्या आकड्यांची वेळेवर नोंद करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील कोविड मृतांच्या नोंदी रोजच्या रोज होत नाहीत, हे गृहीत धरले तरीही महिन्याभरात झालेल्या नोंदींवरुन संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असतानाही अहमदनगर जिल्ह्यातील कोविड मृतांची संख्या मात्र चिंताजनकच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 84492

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *