शिरपुंजेतील भैरवनाथ गडावर यात्रेनिमित्त भाविकांचा महापूर वन विभागासह राजूर पोलिसांनी ठेवला होता चोख बंदोबस्त

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर दिवाळीच्या पूर्वसंध्येला येणार्या रविवारी मोठी यात्रा भरते तिला वाटा असेही म्हणतात. यंदा देखील या यात्रेला राज्याच्या कानाकोपर्यातील आलेल्या भाविकांमुळे अलोट गर्दी लोटली होती.

भैरवनाथ गड हे शिरपुंजेच्या पायथ्यापासून साधारण चौदाशे मीटर उंच आहे. वाट म्हणजे ज्या महिलांना मुले होत नाही त्या महिला पायथ्यापासून केसाने रस्ता झाडीत गडावर जातात असे जुने जाणकार सांगतात. यंदाच्या यात्रेसाठी सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी हजेरी लावल्याने एकच झुंबड उडाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने जागोजागी लोखंडी शिड्या लावल्याने भाविकांचा थोडा त्रास कमी झाला. आदिवासी समाजाचे हे दैवत असल्यामुळे नैवेद्य म्हणून आदिवासी भाविक तांदूळ घेऊन भैरवनाथ गडावर गेले.

दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते. त्यादृष्टीने वन विभाग जय्यत तयारी करत असतो. यावर्षी देखील वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० जवान व ५० स्थानिक तरुणांच्या साथीने बंदोबस्त ठेवला होता. तसेच राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी गृहरक्षक दलाचे जवान व पोलीस तैनात करण्यात आले होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, शिवसेना नेते बाजीराव दराडे, संतोष मुर्तडक यांनी यात्रेला भेट दिली. तर गावकरी गंगाराम धिंदळे, दारकू महाराज धिंदळे, यात्रा समिती, भैरवनाथ तरुण मित्रमंडळ यांच्यावतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.
