खूषखबर! संगमनेर शहरातील रुग्णसंख्या ‘शून्य’ जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही आज झाली मोठी घट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खासगी प्रयोगशाळांकडून स्रावचाचण्या बंद करण्याचा निर्णय संगमनेर तालुक्यासाठी फायद्याचा ठरला असून गेल्या चार दिवसांपासून किरकोळ चड-उतार वगळता तालुक्याच्या रुग्णसंख्येतील घसरण सुरुच आहे. आजही तालुक्यातील सतरा गावे आणि वाड्या-वस्त्यातून अवघे 28 रुग्ण आढळले असून त्यात शहरातील एकाही रुग्णाचा समावेश नाही. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून टिकून असलेले तालुक्यातील कोविड संक्रमण आता गतीने ओसरत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही आज मोठी घट झाली असून एकूण रुग्णसंख्या 214 पर्यंत खाली आली आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात घसरणारी रुग्णसंख्या संगमनेर तालुक्यात मात्र पाय रोवूनच बसली होती. त्यामुळे रोज समोर येणार्‍या रुग्णसंख्येतून आरोग्य यंत्रणेबाबत संशय निर्माण होवू लागला होता. त्यावर उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने खासगी रुग्णालयांद्वारा परस्पर खासगी प्रयोगशाळांना दिल्या जाणार्‍या संशयीतांच्या स्राव नमुन्यांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून खासगी रुग्णालयांमधून खासगी प्रयोगशाळांकडे जाणारे स्राव नमुने टप्प्याटप्प्याने बंद होत असून त्याचा परिणाम तालुक्याची रुग्णसंख्या कमी होण्यात झाला आहे.
खासगी प्रयोगशाळांकडून करण्यात येणारी स्रावचाचणी बंद केल्यामुळे शासकीय प्रयोगशाळांचा ताण वाढू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने नाशिकच्या शासकीय कोविड प्रयोगशाळेकडे दैनंदिन एक हजार स्रावनमुने तपासणीसाठी पाठविण्याची मान्यता प्राप्त केली आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील चाचण्यांची संख्याही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब होवू नये यासाठी प्रशासनाने अहमदनगरच्या शासकीय प्रयोगशाळेकडेही चाचणी नमुने पाठविण्याचा पर्याय कायम ठेवला आहे. त्याचा फायदा संगमनेर तालुक्याला झाला असल्याचे गेल्या चार दिवसांतील अहवालातून समोर येत आहे.

आज तालुक्याच्या ग्रामीणभागातील 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात चिंचपूर येथील 39 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 24 वर्षीय महिला, आनंदवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चणेगाव येथील 50 वर्षीय इसम, धांदरफळ येथील 50 व 49 वर्षीय इसमांसह 45 वर्षीय दोघी व 42 वर्षीय महिला, 23 व 20 वर्षीय तरुणी व 19 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 24 वर्षीय तरुण, निमोण येथील 17 वर्षीय दोघी मुली, पानोडी येथील 60 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 17 वर्षीय मुलगा, सावरगाव तळ येथील 44 वर्षीय महिला, शिरापूर येथील 44 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 50 वर्षीय इसम, निमगाव जाळीतील 52 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 17 वर्षीय मुलगा, कोल्हेवाडीतील 52 वर्षीय इसम, कुरकुटवाडीतील 36 वर्षीय तरुण व घारगाव येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही आज घट नोंदविली गेली असून जिल्ह्यात आज सर्वाधिक 38 रुग्ण राहाता तालुक्यातून समोर आले आहेत. तर संगमनेर 28, राहुरी 26, श्रीगोंदा 22, अहमदनगर महापालिका क्षेत्र 17, पाथर्डी व श्रीरामपूर प्रत्येकी 12, नगर तालुका 10, पारनेर 9, अकोले 8, कोपरगाव व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी सात, नेवासा 6, कर्जत 4, जामखेड व शेवगाव प्रत्येकी 3 व लष्करी रुग्णालयातील दोघांचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *