… अखेर अहमदनगर जिल्ह्यातील फटाकाबंदीचा आदेश रद्द! पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची शिष्टाई; राज्याच्या मुख्य सचिवांचे आदेश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत वायू प्रदूषण टाळण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (ता.19) फटाके बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर फटाका व्यवसायिकांनी मोठी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला होता. काही राजकीय पक्षांनी याबाबत आंदोलनाची तयारी देखील सुरू केली होती. त्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट राज्याच्या मुख्या सचिवांना हा निर्णय मागे घेण्याचे सूचित केले असता मुख्य सचिवांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी हा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे फटाका व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
दीपावलीमध्ये बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोविडचा वाढता धोका लक्षात घेऊन आणि फटाके फोडून वायू प्रदूषण टाळण्यासाठी नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत मंगळवारी फटाके बंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना अंमलबजावणी करण्याचे सूचित केले होते. मात्र, कोविडमुळे आधीच व्यवसायांना फटका बसलेला असताना या निर्णयाने फटाका व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाची देखील तयारी केली होती. ही बाब अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी थेट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या कानावर घातली आणि हा निर्णय मागे घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना याबाबतचे निर्देश देऊन निर्णय मागे घेण्याचे आदेश बजावले. त्यानंतर विभागीय आयुक्त गमे यांनी फटाके बंदीचा निर्णय मागे घेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे नव्याने आदेश काढले आहेत. यामुळे फटाका व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
तत्पूर्वी ‘माझी वसुंधरा’ या कार्यक्रमांतर्गत प्रदूषण मुक्त शहरांसाठी 100 गुण असल्याने विभागीय आयुक्तांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना फटाके बंदी करावी याबद्दल निर्देशित केले होते. मात्र याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक नायकने प्रसिद्ध केले होते. ते सर्वत्र पोहोचल्याने फटाके व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालं होतं. शिवाय फटाके व्यावसायिक जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातच फटाक्यांची खरेदी करून ठेवतात. यामध्ये लाखो-करोडो रुपयांची गुंतवणूक असते आणि त्यांचे वार्षिक उदरनिर्वाह या फटाक्यांच्या व्यवसायावर असतात. त्यामुळे नाशिक विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मोठी नाराजी उठली होती. अखेर मंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.