महिला बचतगटांच्या माध्यमातून कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल ः राजेश कुमार अकोले येथील महामेळाव्यात 1 कोटी 56 लाख रुपयांहून अधिक कर्जास मंजुरी
नायक वृत्तसेवा, अकोले
महिला बचतगटांना सर्वांगीण विकासाबाबत भारतीय स्टेट बँक महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध व इतर सदस्यांकडून आर्थिक सक्षम महिलांना योग्य सन्मान व निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल. बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातून कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँक महारष्ट्र सर्कलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी केले.
भारतीय स्टेट बँकेच्या अकोले शाखेने क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय अहमदनगर यांच्या माध्यमातून पंकज लॉन्स व मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर, वाहन व गृह कर्ज मेळावा आणि जिल्हास्तरीय महिला बचतगट महामेळाव्याचे नुकतेच डेस्क ऑफिसर धनाजी भागवत यांनी सुंदर आयोजन केले होते. तसेच या बचतगट महामेळाव्यास जिल्ह्यातून अहमदनगर, राहुरी, कोपरगाव, नेवासा, अकोले व अकोल्यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागातून 130 महिला बचतगटातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या महामेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, भारतीय स्टेट बँक आंचलीय कार्यालय औरंगाबादचे उपमहाव्यवस्थापक रवीकुमार वर्मा, अहमदनगरचे सहाय्यक महाव्यवस्थापक विनोद कुमार, अकोले शाखेचे व्यवस्थापक नितीन वानखेडे, बायफ संस्थेचे विभागीय व्यवस्थापक, वैभव कदम, रिजनल सेक्रेटरी ऑफिसर यूनियन जितीन साठे आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामविकास विभागांतर्गत उमेद संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचतगटाची स्वतंत्र बँक स्थापन करण्याची योजना शासन आखत आहे. राज्यातील महिला बचतगट हे केवळ सरकारी काम किंवा अभियान म्हणून न राहता ते महिलांच्या सर्वांगीण उन्नतीचे काम कसे होईल या दृष्टीकोनातून भारतीय स्टेट बँक बचतगटांना अर्थ सहाय्य करीत आहे. समाजातील सर्व महत्वाच्या घटकांच्या उन्नतीसाठी उपयुक्त व विशेषकरून महिलांना कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत स्थान निर्माण करून देण्याबरोबरच समाजात आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणार्या महिला बचतगट महामेळाव्याचे प्रयोजन महत्त्वपूर्ण आहे. आजच्या महामेळाव्यात बचतगटांना 1 कोटी 56 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. तसेच वेळेवर परतफेड करणार्या बचतगटांना मागणीनुसार कर्जाच्या रकमेत भरीव वाढ करू. याद्वारे महिलांचे मनोबल वाढविण्यास मदत होईल व आर्थिक स्वावलंबन झाल्याने समाजात पत वाढेल. महिलांमधील आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून उमेद नवनवीन योजना राबवित आहे असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी नमूद केले.
प्रास्ताविक राहुरी येथील शाखा व्यवस्थापक जनार्दन बोंतले यांनी केले. सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. धामणगाव आवारी, तालुका अकोले येथील नीता आवारी यांच्या नेतृत्वाखालील दिशा बचतगटातील महिलांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी उमेद संस्थेचे सोमनाथ जगताप, श्रीकांत शेवाळे, बाबासाहेब सरोदे, मंजूषा धिवर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी वेळेवर परतफेड करण्यात आघाडीवरील बचतगटातील महिलांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर किरण कुटे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी दीपाली चांडक, अर्चना चिपाडे, रेणू चिपाडे, अकोल्याचे व्यवस्थापक नितीन वानखेडे, कार्तिक धामणे, रामदास शहाणे, वैभव कदम, कुणाल नेरकर, विवेक कुलकर्णी, शैलेश बकले, योगेश जोशी, धनाजी भागवत, किरण तळपे आदिंनी परिश्रम घेतले. शेवटी व्यवस्थापक नितीन वानखेडे यांनी आभार मानले.