आरटीओ प्रतिनिधीच्या मृत्यूबाबत निकटवर्तीयांना वेगळाच संशय! ऑनलाईन पद्धतीने काम चालणार असल्याने अस्वस्थ असल्याची चर्चा

नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात विमा आणि आरटीओ प्रतिनिधी म्हणून काम करणारे गुलाब रानुजी मोढवे (वय 58, रा.राहुरी फॅक्टरी) यांचा मृतदेह मुळा धरणात आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. ऑनलाईन पद्धतीने काम चालणार असल्याने देशभरातील आरटीओ बंद होणार असल्याची बातमी त्यांनी कोठे तरी वाचली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ असल्याची चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये आहे. मात्र, त्यांनी अशी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली नाही.

दोन दिवसांपासून मोढवे बेपत्ता होते. सकाळी सातच्या सुमारास पेपर आणण्यासाठी जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर घरी आलेच नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आणि शोध सुरू केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मुळा धरणात वावरथ-जांभळी शिवारात पाण्यात कडेला एक मृतदेह तंरगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह गुलाब मोढवे यांचाच असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, वावरथचे सरपंच रामदास बाचकर, बारागाव नांदूरचे सरपंच निवृत्ती देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली.

मोढवे यांच्या मृतदेहाजवळ किंवा घरी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात यासंबंधी अद्याप पोलिसांनी काहीही निष्कर्ष काढलेला नाही. मोढवे विमा व आरटीओ प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आल्यापासून ते अस्वस्थ होते, असे काहींचे म्हणणे आहे. ऑनलाईन पद्धतीने काम चालणार असल्याने परिवहन कार्यालये बंद होणार, अशी ती बातमी होती. तेव्हापासून मोढवे अस्वस्थ होते. आधीच लॉकडाऊनचा फटका बसलेला असताना आरटीओ बंद झाल्यावर आपले कसे होणार, या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा तर्क लावला जात आहे. पोलिसांकडून मात्र याला दुजोरा मिळालेला नाही. सर्व बाजू लक्षात घेऊन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visits: 16 Today: 2 Total: 116861

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *