लाचार होऊन कोणाचेही नेतृत्व स्वीकारणार नाही! खासदार डॉ. सुजय विखे यांची शेवगावमध्ये जोरदार फटकेबाजी

नायक वृत्तसेवा, शेवगाव
‘सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. कोण कोणाला पाडतंय आणि कोण कोणाबरोबर जाणार आहे, हे काहीच कळायला मार्ग नाही. त्यामुळे आपल्यालाही कोणासोबत रहायचे हे ठरवावे लागेल. मात्र, कोणाचेही नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो नाही. स्वंतत्र निघेल पंरतु, दुसर्‍या कोणा चुकीच्या माणसाच्या पाया पडायचं पाप मी करणार नाही,’ असे वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. त्यांचा रोख नेमका कोणाकडे, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

शेवगावमध्ये एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या सुजय विखेंनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या शेवागावच्या आहेत. त्यामुळे यावेळी विखे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर सावरून घेत त्यांनी सध्याच्या राजकीय अस्थिर परिस्थितीकडे आणि भविष्यातील परिस्थितीत काय होईल, हे सांगता येत नसल्याकडे लक्ष वेधले. अशा परिस्थितीत आपलीही भूमिका ठरवावी लागेल, असे ते सांगत असताना कार्यकर्त्यांमध्ये पक्ष बदलायचाय काय, अशी कुजबुज सुरू झाली. त्यावर डॉ. विखे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या तरुणांना काम करण्याची संधी मिळाली, यातच आमचे भाग्य आहे. आम्हांला भाजप सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. कोणाला सोबत घ्यायचा हा विषय आहे. ज्या माणसांनी, ज्या पक्षांनी सिंचन क्षेत्रात घोटाळे करून राज्यातील शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आणली त्यांचे नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो नाही. स्वंतत्र निघेन पंरतु दुसर्‍या कोणा चुकीच्या माणसाच्या पाया पडायचं पाप करणार नाही. बाळासाहेब विखे यांनी हेच तत्व सांभाळले होते आणि आम्हालाही तीच शिकवण दिली आहे.’

विखे पाटील यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या बोलण्याचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे असल्याचे मानले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नगरला आले होते. कार्यक्रमाचे संयोजन खासदार या नात्याने सुजय विखे पाटील यांच्याकडे होते. या कार्यक्रमाला गडकरी यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात पवार आणि गडकरी यांनी एकमेकांचे कौतुक केले. मूळात या कार्यक्रमास पवार यांना निमंत्रित करण्यावरूनच राजकीय चर्चा रंगली होती. पवारांना निमंत्रण आपण नव्हे तर गडकरी यांनीच दिले होते, असे सुरुवातीपासून विखे पाटील सांगत होते. या कार्यक्रमाशीही आजच्या विखे यांच्या वक्तव्याचा संदर्भ जोडला जात आहे.

Visits: 1 Today: 1 Total: 16370

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *