रक्तदाब वाढवणार्या इंजेक्शनची संगमनेरात बेकायदा विक्री! छापा टाकत पोलिसांची कारवाई; विक्री करणार्या तरुणाला अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हृदय आणि निम्न रक्तदाबाच्या रुग्णांवरील वैद्यकिय उपचारांसाठी वापरले जाणारे ‘मेफेनटर्माइन सल्फेट’ हे इंजेक्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणार्या एकाला शहर पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार पालिकेजवळील शास्त्री चौकातील एका शॉपवर छापा घालीत पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी सदरील औषधाच्या प्रत्येकी दहा मिलीच्या तीन बाटल्यांसह सिरींज, मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण दोन लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईने शरीरसौष्ठव करणार्या तरुणांना प्रोटीन्स विक्री करणारी ठिकाणं चर्चेत आली असून अन्न आणि औषध प्रशासनाची निष्क्रियताही उघड झाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आदित्य गुप्ता याच्या विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे, आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा छापा सोमवारी (ता.27) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घालण्यात आला होता. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक सावंत यांनी सुरुवातीला अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सोमनाथ मुळे यांना याबाबत सूचित करण्यासाठी फोन केला, मात्र महिन्याच्या विशिष्ट तारखांनाच सक्रिय असलेल्या या विभागाशी कोणताही संपर्क न झाल्याने अखेर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल खुळे व क्षीरसागर यांच्यासह मिळालेल्या माहितीप्रमाणे नगरपालिकेजवळील शास्त्री चौकात असलेल्या ‘एम.आर.व्हिटॅमीन सप्लिमेंट शॉप’ या ठिकाणी सापळा लावून बनावट ग्राहक पाठवले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास घडत असलेल्या या प्रकारात बनावट ग्राहकाने शॉपमध्ये जावून ‘मेफेनटर्माइन सल्फेट’ औषधाची मागणी करताच दुकानदाराने त्याची पूर्तता केली. हा व्यवहार पूर्ण होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा घालीत
आदित्य किशोर गुप्ता (वय 24, रा.साईनगर, संगमनेर) याला ताब्यात घेत त्याच्याकडून डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास कठोर मनाई असलेल्या ‘मेफेनटर्माइन सल्फेट’ इंजेक्शनच्या प्रत्येकी दहा मिलीच्या तीन बाटल्या, नऊ सिरींज, यामाहा कंपनीची दुचाकी (क्र.एम.एच.15/एच.पी.6646) आणि 16 हजार 250 रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी एम.आर.व्हिटॅमीन सप्लिमेंट शॉपचा चालक आदित्य किशोर गुप्ता (वय 24, रा.साईनगर) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 123, 125, 278 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आज (ता.28) दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
बीएनएसच्या कलम 123 प्रमाणे एखाद्या व्यक्तिला दुखापत पोहोचवण्याच्या हेतूने किंवा कोणताही गुन्हा करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुविधा देण्याच्या हेतूने किंवा त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे हे माहिती असतानाही त्या व्यक्तिला विष, अंमली पदार्थ, नशा आणणारे किंवा अपायकारक औषध विक्री अथवा पुरवठा केल्यास दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा होवू शकते.

‘मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन’चा वापर हृदय अथवा रक्तदाबाच्या संबंधी उपचारादरम्यानच केला जातो. विशेषता ज्या रुग्णांचा रक्तदाब कमी आहे, त्यांचा रक्तदाब वाढवण्यासाठी त्याचा वापर होतो. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये सदरचे औषध शेड्यूल ‘एच’ श्रेणीत मोडते. त्यामुळे त्याचे उत्पादन, साठवणूक व वाहतुकीसह तज्ञ डॉक्टरांच्या अधिकृत
चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करण्यास कठोर नियम आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेचेही प्रावधान करण्यात आलेले आहे. राज्यात या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आधुनिक जिममध्ये अथवा शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात मेहनत घेणार्यांना प्रोटीन्स पुरवठा करणार्या दुकानांमध्ये अवैधपणे या औषधाची विक्री करणार्यांवर या विभागाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे.
मात्र जिल्ह्यातील हा विभाग मनुष्यबळाचे कारण देत प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखांनाच सक्रिय होत असल्याने मानवी शरीरावर घातक परिणाम करणार्या अशा औषधांची जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यात सर्रास विक्री होत असल्याचेही शहर पोलिसांच्या या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

मेफेनटर्माइन सल्फेट उत्तेजक औषध असल्याने व्यायाम करणारे तरुण, पहेलवान अथवा शरीरसौष्ठव करणारे तरुण शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यातून जलदगतीने स्नायू ताणण्यासाठी त्याचा वापर करतात. हे एक प्रकारचे सिम्पॅथोमिमेटिक औषध आहे, ज्याच्या सेवनाने शरीराच्या ‘लढा किंवा पळा’ प्रणालीवर परिणाम होतो. या औषधाच्या नियमित सेवनाने आरोग्यावर घातक परिणाम होवू शकतो. अचानक रक्तदाब वाढत असल्याने हृदयाची गती वाढून हृदविकाराचा अधिक धोका असतो.
अचानक उत्तेजना वाढत असल्याने मज्जासंस्थेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यातून चिंता, नैराश्य, अस्वस्थता, अनिद्रा, डोकेदुखी, शारीरिक कंप आणि चिडचीड या सारख्या व्याधी जडू शकतात. त्यामुळेच डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय सदरचे औषध विकण्यास मनाई आहे.

अन्न व औषध प्रशासनासह निष्क्रियतेच्या शिखरावर असलेल्या शहर पोलिसांच्या या कारवाईने शहरात नशेसारख्या काय काय गोष्टी सहज कोठेही उपलब्ध होतात याचे जिवंत चित्रच उभे केले आहे. मध्यंतरी शहरातील महाविद्यालये व शाळांच्या आवारातील काही पानटपर्या व अन्य ठिकाणांवर गांजा, त्यापासून बनवलेल्या सिगारेट व अगदी
एमडीसारख्या अतिशय घातक आणि आयुष्य बर्बाद करणार्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्याही खूप चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोन्ही विभागांकडून त्याला खूपकाही महत्व दिले गेले नाही. त्यातून अशाप्रकारचे अंमलीपदार्थ विक्री करणार्यांची हिम्मत वाढली असून विद्यार्थीदशेतील तरुणाई त्याच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित विभागांनी वेळीच धोक्याची पावलं ओळखून संयुक्तपणे कठोर कारवाई करुन अशा उद्योगांचे समूळ उच्चाटण करण्याची गरज आहे.

