माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझाही सन्मान! केंद्रीय मंत्री आठवलेंच्या प्रश्नाला माजी मंत्री पिचडांचे भन्नाट उत्तर

नायक वृत्तसेवा, अकोले
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही महत्त्वाच्या पदांपासून दूर असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अनाहुत प्रश्नाला समोरे जावे लागले. अर्थात त्यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिले. आठवले यांनी पिचड यांच्याशी खासगीत गप्पा मारताना ‘राज्यात भाजपकडून तुम्हांला कोणते पद मिळाले का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘माझे आता वय झाले आहे, मला काही नको, माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझाही सन्मान,’ असे उत्तर पिचड यांनी दिले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज अकोले तालुक्यात आले होते. स्वागताचा कार्यक्रम झाल्यावर खानपान सुरू असताना कौटुंबिक चर्चा झाली. सध्याचे राजकारण, देशाचे राजकारण यावरही चर्चा झाली. त्यावेळी आठवले यांनी हळूच विषय काढत ‘तुम्हाला भाजपकडून राज्यात काही पद मिळाले का?’ असा प्रश्न केला. त्यावर पिचड म्हणाले, ‘माझे आता वय झाले आहे. पक्षाने मुलगा वैभव याला आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मंत्री हे पद दिले आहे. माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझा सन्मान. मात्र, तालुक्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निश्चित आवाज उठवू. या वयात आपण सामाजिक न्याय देण्यासाठी वेळ पडली तर न्यायालयात जाऊ आपणही मागासवर्गीय प्रश्नांसाठी बोलवा आपण तयार आहोत. आदिवासी आरक्षणाबाबत सत्तेत असतानाही माघार घेतली नाही,’ असे पिचड म्हणाले.

पिचड राज्यातील भाजप कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेत त्यांच्या मुलाचा पराभव झाला. त्यानंतर पिचड पक्षात एकाकी पडल्याची टीका विरोधी पक्षांकडून सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर तशी टीका झाली होती. त्यानंतर भाजपने पिचड यांच्यासोबत असल्याचे दाखविण्यासाठी वेळोवेळी कृती केली. त्यांचा मुलगा वैभव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले. मात्र, स्वत: पिचड यांच्याकडे राज्यात व केंद्रातील मोठे पद नाही. अलीकडेच राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पद न मिळाल्याची चर्चा झाली. पिचड यांनाही पद मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी राजूरला येऊन पिचड यांची घेतलेली भेट आणि त्यांना विचारलेला प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

पिचड यांचे उत्तर ऐकून आठवले यांनीही त्यांच्या कामात साथ देण्याचे आश्वासन दिले. आदिवासींच्या प्रश्नावर आणि भंडारदरा धरणाला क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्याच्या विषयावर पिचड यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रणही आठवले यांनी दिले. ‘आदिवासी समाजाचे केंद्रीय पातळीवरील प्रश्न मला सांगा मी पाठपुरावा निश्चित करेल, तुमचे राज्य मंत्रिमंडळातील काम अविस्मरणीय होते. राज्यातील आदिवासीच्या विकासात तुमचा सिंहांचा वाटा आहे. हे मी जवळून पाहिले तर वैभवला सांगा पराभवाने खचायचे नसते. अकोले तालुक्यात माझा पक्ष तुमच्यासोबत आहे,’ असे आश्वासनही आठवले यांनी पिचड यांना दिले.

Visits: 15 Today: 1 Total: 118100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *