नवरात्रौत्सवानिमित्त ‘जागर लोककलेचा, वसा स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

नवरात्रौत्सवानिमित्त ‘जागर लोककलेचा, वसा स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन
ऐतिहासिक नवदुर्गा एकपात्री प्रयोगाद्वारे करणार ऑनलाईन जागर; जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेड तर्फे नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवसीय ‘जागर लोककलेचा, वसा स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग, महाराष्ट्रभरातील विविध संस्कृतिक लोकगीते जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सादर करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शक्तीचे दर्शन या विषयांवर व्याख्यानमालेसह प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संगमनेर तालुकाध्यक्षा सुवर्णा खताळ यांनी दिली आहे.


शनिवारी (ता.17) घटस्थापनेच्या दिवशी दुपारी दोन वाजता ऑनलाइन होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवधर्म संसद सदस्य तथा माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाने प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतील. विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांसह अतिशय दुर्मिळ अशा विषयांवरील व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये शिवप्रदीपाचार्य डॉक्टर दिलीप धाणके (ठाणे) यांचे जिजाऊ पारायण, पहिल्या अहिराणी भाषेतील डॉक्टरेट मिळवणार्‍या साहित्यिक व प्रा.डॉ.उषा सावंत (नाशिक) यांच्या जात्यावरच्या ओव्या, लग्न व हळद आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक, मुक्त पत्रकार डॉ.सुभाष देसाई (कोल्हापूर) यांचे ‘अंबाबाई महात्म्य : सत्य व मिथके’ यावरील व्याख्खयानांचा समावेश आहे.


डॉ.शंकर निकम (मुंबई) यांचे स्त्री पुरुष समानता व स्त्रियांचे धार्मिक अधिकार या विषयावर व्याख्यान होणार आहे. कवयित्री व लेखिका प्राचार्या डॉ.अनुराधा वर्‍हाडे यांच्याशी हितगुजाचा थेट कार्यक्रम देखील होणार आहे. प्रख्यात निवेदिका व जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख क्षिप्रा मानकर (अमरावती) यांचे ‘समाज घडविण्यासाठी समाज परिवर्तन’ यावर व्याख्यान होईल. डॉ.विजय चोरमारे (कोल्हापूर) यांचे वर्तमानातील स्त्री शक्ती ओळख या विषयावर व्याख्यान होईल. ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.साहेब खंदारे (परभणी) हे देवीबाबत मिथकांचा संबंध यावर समारोपीय व्याख्यान करतील. या कार्यक्रमांची तांत्रिक व्यवस्था शिप्रा मानकर बघणार आहेत.


सर्व कार्यक्रम 17 ते 25 ऑक्टोबर, 2020 या काळात दररोज दुपारी दोन ते चार वाजता महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अधिकृत पेजवर पहावयास मिळतील. सर्व शिव-जिजाऊ प्रेमींनी हा कार्यक्रम फेसबुक पेजवर बघावा, असे आवाहन महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सहसचिव राजश्री शितोळे, राज्य कार्यकारिणी सदस्या जयश्री कुटे व डॉ.दीपाली पानसरे, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षा संपूर्णा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्रद्धा वाणी, जिल्हा कार्याध्यक्षा वृषाली कडलग, संगमनेर तालुकाध्यक्षा सुवर्णा खताळ, नीलम शिंदे, माधुरी शेवाळे, श्रद्धा देशमुख, उज्ज्वला देशमुख, वृषाली साबळे, स्नेहलता कडलग यांनी केले आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 116057

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *