चोरट्याने ठेवल्या संगमनेर पोलिसांच्या हातावर तुर्‍या! डोळ्यादेखत झाला भुर्रर; संगमनेर व्यापारी असोसिएशन आक्रमक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे गेल्या काही वर्षात शहराची विस्कटलेली घडी पूर्ववत करतील अशी भाबड्या संगमनेरकरांची अपेक्षा फोल ठरत असल्याचे काही दिवसांतच स्पष्ट दिसू लागले आहे. रात्री दहाच्या सुमारास सक्तीने शहरबंद, शहर व उपनगरात सातत्याने गस्त आणि दिवसा विद्यार्थ्यांच्या दुचाकींवर कारवाया असे सत्र राबवून शहरात कायद्याचे राज्य असल्याचा भास आता अभासासारखा जाणवू लागला असून नव्याचे नऊ दिवस संपुष्टात येवून शहरातील चोर्‍या, घरफोड्या, अवैध धंदे व बंद असलेले गोवंश कत्तलखाने पूर्ववत सुरू झाले आहेत. त्याचा परिणाम गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक पूर्णतः संपला असून त्याची प्रचिती रविवारी पहाटे संगमनेरकरांना आली. अतिशय गजबजलेल्या बसस्थानकाच्या परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेत दुकानातच असलेला चोरही पोलिसांना धरता आला नाही. विशेष म्हणजे यावेळी सदरील दुकानाच्या बाहेर पोलिसांसह सामान्यांचीही उपस्थिती होती. मात्र त्या सर्वांच्या हातावर तुर्‍या ठेवीत अवघ्या काही क्षणातच जवळजवळ हाती येणारा चोरटा भुर्रर झाला, या घटनेने पोलिसांची निष्क्रियताही दिसून आली असून या प्रकाराने शहरातील व्यापार्‍यांचा मात्र संताप झाला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार सदरची धक्कादायक घटना रविवारी (ता.30) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास संगमनेर बसस्थानकासमोरील हॉटेल काश्मिरच्या शेजारील गणेश किराणा या दुकानात घडली. यावेळी एका सराईत चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूचा छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतरच्या पंधरा ते वीस मिनिटे दुकानात सर्वत्र शोधाशोध करुन त्याने महागड्या सिगारेट व अन्य सामानात चोरण्याच्या बेताने एकत्रित केले. सुदैवाने सदरील दुकानाचे मालकांनी आतील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. रात्री अडीचच्या सुमारास ते लघुशंकेसाठी उठले असता सहज म्हणून दुकानाची स्थिती जाणण्यासाठी त्यांनी आपल्या मोबाईलवर दुकानातील सीसीटीव्ही पाहिला असता त्यांना दुकानात चोर असल्याचे दिसले.

त्यानंतर त्यांनी तत्काळ आपल्या भावाला उठवून शहर पोलीस ठाण्याला घटनेबाबत कळविले व ते स्वतः दुकानाच्या चाव्या घेवून भावासह तेथे हजर झाले. काहीवेळातच तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार व चालक अजय आठरे हे दोघेही सरकारी वाहन घेवून हजर झाले. दुकानातील चोरटा पसार होवू नये यासाठी दुकानचालकाचा भाऊ आणि सहाय्यक निरीक्षक पवार यांच्यासह त्यावेळी तेथे उपस्थित असलेले दोघे-तिघे पाठीमागील बाजूने पत्रावर जावून उभे राहिले, त्यामुळे चोरट्याचा पळून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तो अगदी सहज पोलिसांच्या हाती लागण्याची पूर्ण शक्यता होती. मात्र ज्यांच्या कंबरेला पिस्तूल तेच धाब्यावर चढून बसल्याने प्रत्यक्ष शटरजवळ केवळ सरकारी वाहनाचा चालक, दुकानदार आणि अन्य काही माणसं उभी राहिली.

त्यातच हजर असलेल्या संबंधित अधिकार्‍याने शटर उघडून त्याला पकडण्याचा आदेश दिला, मात्र त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच तो पळून जाईल अशी भीती व्यक्त केली. हा सगळा गदारोळ आणि बोलण्याचा आवाज चोरट्यालाही ऐकू येत असल्याने आपण आता पकडले जाणार याची त्याला पूर्ण कल्पना आली. त्यातून वाचण्यासाठी त्याने त्याच दुकानातील गोडेतेल आपल्या हातापायांना लावले आणि तो शटरजवळ दबा धरुन बसला. अधिकार्‍याच्या आदेशानुसार खाली असलेल्या कर्मचार्‍याने संबंधित दुकानदारास दुकानाचे शटर उघडण्यास सांगितले. दोन्ही कुलूप उघडून ते अवघे दोन फूट वर उचलताच आधीच दबा धरुन बसलेला चोरटा सापासारख सळसळत दुकानाच्या बाहेर पडला आणि तेथे उपस्थितांना काही कळायच्या आंतच दोघांना धक्का मारुन सुसाट वेगाने नाशिकच्या दिशेने पळाला.

त्यानंतर दुकानचा चालक आणि त्याने बोलावलेल्या त्याच्या मित्रमंडळींसह पोलिसांच्या वाहनाने त्याचा पाठलागही केला व त्याला नामदार निवासाजवळ एकाने पकडलेही. मात्र त्याने अंगाला गोडेतेल चोपडलेले असल्याने धरणार्‍याचा हात सटकला आणि त्याचे बनियन पूर्णतः फाटून त्याच्या हाती आले, मात्र तोपर्यंत चोरटा जाणताराजा मैदानावरील अंधारात अदृश्य झाला होता. हा प्रकार पोलिसांची नाचक्की करणारा होता, मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक दिसून आले नाही. सदरचा प्रकार दुकानदाराने मोबाईलवर सीसीटीव्ही पाहिल्याने उघड झाल्याने त्यांचे मोठे नुकसान टळले असले तरीही चोरट्याने सुरुवातीला गल्ल्यावर डल्ला मारुन दहा हजारांची रोकड लांबविल्याचे आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

विशेष म्हणजे बसस्थानकाच्या अगदी समोर असलेल्या आणि चोवीस तास राबता असलेल्या हॉटेल काश्मिरसारख्या गजबजलेल्या ठिकाणावरील गणेश किराणा या दुकानात घडलेला हा प्रसंग पहिला नाही तर एकाच महिन्यात घडलेला दुसरा प्रकार आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजीही अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचा पत्रा उचकटून अशाच पद्धतीने आत प्रवेश करीत सुमारे दीड लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लांबविला होता. त्याचा शोध लागण्यापूर्वीच अवघ्या सत्तावीस दिवसांतच पुन्हा त्याच दुकानात आणि तशाच पद्धतीने चोरीचा प्रकार घडल्याने आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत त्यांच्या हातावर तुर्‍या ठेवून चोरटा सहज पसार झाल्याने शहर पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक संपल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने व अशा घटनांचे तपासच लागत नसल्याने शहरातील व्यापारी वर्ग दहशतीखाली आला असून या घटनेनंतर शहरातील व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या संगमनेर व्यापारी असोसिएशनने एकत्रित होवून पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यातून वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासह यापूर्वी घडलेल्या घटनांचे तपास लावून शहरात निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे, पुन्हा अशाप्रकारची घटना घडल्यास असोसिएशनकडून तीव्र स्वरुपाचे आंदोलन पुकारण्याचा आक्रमक पवित्राही या निवेदनातून मांडण्यात आला आहे.


बसस्थानकासमोरील गणेश किराणा या दुकानात अवघ्या सत्तावीस दिवसांत दुसर्‍यांदा चोरीचा प्रकार घडला. यावेळी मात्र चोरटा जेरबंद होण्याची पूर्णतः शक्यता असताना आणि चक्क पोलिसही घटनास्थळी हजर असतानाही त्यांच्या हातावर तुर्‍या ठेवून बराचवेळ दुकानात अडकून पडलेला चोरटा अगदी सहीसलामत पसार होण्यात यशस्वी झाल्याने संगमनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावरुन चोरट्यांना पोलिसांचाही धाक नसल्याचे समोर आल्याने शहरातील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 29291

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *