केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच काँग्रेस सत्तेला चिकटून ः विखे शिर्डी नगरपरिषदेसाठी अधिसूचना निघाल्याबद्दल व्यक्त केला आनंद
नायक वृत्तसेवा, राहाता
नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. अपमान होत असताना केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच काँग्रेस सत्तेला चिकटून राहिली आहे, अशी खरमरीत टीका विखे पाटील यांनी केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय राजकारणात पुन्हा तिसर्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला बाजूला सारत ही आघाडी केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी-शरद पवार भेट सध्या चर्चेत असून विखे पाटील यांनी या भेटीवरून काँग्रेसवर निशाणा साधला. ‘शरद पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींनी केलेलं विधान म्हणजे यूपीएचं विसर्जन झाल्यासारखं आहे,’ असं ते म्हणाले. पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्वाबद्दल अवमानकारक गोष्टी घडत असताना काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही, असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला आहे.
दरम्यान, शिर्डी नगरपरिषदेसाठी अधिसूचना निघाल्याचा आनंद होत असून हे राज्य शासनाला उशिराने सूचलेलं शहाणपण आहे, असं विखे पाटलांनी म्हंटलं आहे. सध्या सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून शिर्डीचा लौकिक आहे. नगरपरिषद व्हावी म्हणून नगरविकास मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. नगरपंचायतीने ठराव करूनही राज्य सरकारला जाग येत नव्हती. शेवटी न्यायालयात दावा दाखल करावा लागला. निवडणुकीवर बहिष्कार टाकून एकजूट दाखवल्याबद्दल शिर्डीकरांचे अभिनंदन करायला हवे. हा शिर्डी ग्रामस्थांचा विजय असल्याचंही ते म्हणाले.