साहेब… हातातोंडाशी आलेला घास भीज पावसाने हिरावला! नांदूर खंदमाळ येथील व्याकुळ झालेल्या शेतकर्यांनी मांडल्या व्यथा

नायक वृत्तसेवा, घारगाव
साहेब… हातातोंडाशी आलेला शेंद्री कांद्याचा घास हा सुरू असलेल्या भीज पावसाने अक्षरशः हिरावून नेला आहे. डोळ्यादेखत शेतातच कांदे सडून गेले आहेत, अशा व्यथा पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील व्याकुळ झालेल्या शेतकर्यांनी मांडल्या आहेत.

नांदूर खंदरमाळ, मोरेवाडी, बावपठार या गावांसह आदी गावे शेंद्री कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. दरवर्षीप्रमोण शेतकर्यांनी यंदा देखील कांदे, सोयाबीन आदी पिके घेतली आहे. सध्या ही दोन्ही पिके काढणीस आलेली असताना गेल्या काही दिवसांपासून भीज पावसाने या दोन्ही पिकांची पुरती वाट लावली आहे. कांद्याच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे कांदे सडण्याच्या मार्गावर आहे. पठार भागातील शेतकर्यांची शेती ही फक्त पावसावरच अवलंबून असते व पावसाळ्यात बाजरी, ज्वारी, सोयाबीन, शेंद्री कांद्यासह इतर पिके घेतली जाता. बाकी वर्षभर इतर वेळेस ही जमीन पडीक अवस्थेतच असते. त्यामुळे कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक गणित हे या पिकांवरच अवलंबून असते. मात्र दुष्काळ, अतिवृष्टी अशा अस्मानी संकटामुळे व शेती पिकाला नसलेल्या बाजारभावामुळे शेतकर्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे.
![]()
तर पठारावरील शेतकरी हे ही पिके वर्षभराची पुंजी असल्यामुळे पोटच्या पोरासारखा जीव लावून करतात. पीक चांगले येण्यासाठी वेळप्रसंगी हातउसनवारी, बँका, पतसंस्थांचे उंबरे झिजवत असतानाच पत्नीचे दागिने देखील गहाण ठेवण्याची वेळ येते. एवढे सगळे करुनही अशा संकटांमुळे एका दिवसात होत्याचे नव्हते होत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा जुगार झाला असल्याची बर्याच शेतकर्यांची धारणा झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीही असाच मोठा पाऊस झाल्याने पिके गेली होती. त्यावेळेस जिल्हाधिकार्यांनी पठारभागाचा दौरा करत पंचनामे केले होते. परंतु शेतकर्यांच्या पदरी काहीच न आल्याने त्यांचा दौराही फोल ठरला होता. त्यामुळे साहेब… आमची व्यथा आम्ही मांडायची कुणासमोर असा प्रश्न आम्हांला पडला आहे, अशा व्याकुळ झालेले नांदूर खंदरमाळ येथील शेतकरी सकाहरी करंजेकर, संदीप मस्के, भारत पंडीत आदिंनी व्यथा मांडल्या आहेत.
