राहुरीमध्ये सख्खे भाऊ मुळा नदीच्या प्रवाहात वाहून गेले तिघे बालंबाल बचावले; आई आणि बहिणीने केला आक्रोश

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील बारा ते पंधरा वयोगटातील पाच मुले गणपती घाट परिसरातील मुळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. पैकी दोघेजण सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्देवी घटना मंगळवारी (ता.5) दुपारी एक वाजता घडली. त्यांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र, यात तिघेजण बालंबाल बचावले.

अमर चंद्रकांत पगारे (वय 15) व सुमित चंद्रकांत पगारे (वय 12, रा. लोहार गल्ली, राहुरी) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान वाहून गेलेल्या मुलांना वडील नसल्याचे समजते. दोन्ही मुले, आई व एक बहीण असे कुटुंब होते. घटनास्थळी आई व बहिणीने एकच आक्रोश केला. धीर सुटल्याने आई बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. शहरातील लोहार गल्लीतील अमर व सुमित यांच्यासह समीर सचिन खंडागळे, शाहीर सचिन खंडागळे, रिहान भैय्या शेख ही मुले मुळा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. दुपारी एक वाजता सुमित पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अमर सुद्धा वाहून जाऊ लागला. पंकज नारद, उत्तम आहेर, शाहरूख सय्यद, सोन्या सय्यद, सिद्धार्थ कर्डक या तरुणांनी अमर व सुमित यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही क्षणात दोघे भाऊ पाण्यात दिसेनासे झाले.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे राजेंद्र पवार, महेंद्र ताकपिरे यांनी पथकासह धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. परंतु, शोध लागला नाही. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
