एस. आर. थोरात समूहामार्फत साडेआठ कोटी बँकेत वर्ग ः थोरात

एस. आर. थोरात समूहामार्फत साडेआठ कोटी बँकेत वर्ग ः थोरात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एस. आर. थोरात समूहमार्फत मागील 27 वर्षांची परंपरा जपत दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध दर फरकाबरोबर दूध पेमेंट 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत, वाहतूक पेमेंट, दूध वितरक कमिशन, कर्मचारी पगार व बोनस आणि सभासद लाभांश असे एकूण साडेआठ कोटी रुपये बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब थोरात यांनी दिली.

संचालक मंडळ बैठकीत संस्थेचे संचालक पृथ्वीराज थोरात यांनी मत व्यक्त करताना संस्थेने दूध उत्पादकांसाठी गतवर्षात राबविलेले उपक्रम दूधाळ गायी खरेदीसाठी व संगोपनासाठी आय.सी.आय.सी.आय. बँक व किसान क्रेडीट कार्ड योजने मार्फत दोन कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले, त्याचबरोबर ‘मिशन गगनभरारी’च्या अंतर्गत पशुवैद्यकीय सेवा, संतुलित आहार, गोठा विकास, आरोग्य विमा, आदर्श दूध संकलन आणि सेंद्रिय व पूरक पोषक चारा लागवडसारखे यशस्वी उपक्रम राबवत आहोत व पुढील काळात प्रतिजैविके व बुरशी विरहीत दूध निर्मितीसाठी संस्था आग्रही राहणार असल्याचे सांगितले.

शेवटी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब थोरात मत व्यक्त करताना म्हणाले, देशभर 21 मार्च, 2020 पासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला. परंतु याचा सर्वाधिक फटका हा दूध उत्पादकांना सहन करावा लागला. दूध खरेदी दर 32-33 रुपये असताना अचानक 20-22 रुपयांपर्यंत खाली आले. कारण बाजारामध्ये दूध व्यवसायावर अवलंबून असणारे सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली. परंतु दूध उत्पादनात सातत्य टिकून राहण्यासाठी संस्थेने एकही दिवस दूध संकलन बंद ठेवले नाही व सर्व व्यवहार सुरळीत ठेवले. मात्र महाराष्ट्र शासनाने फक्त सर्व सहकारी दूध संघांना 5 रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केल्यामुळे संस्थेला त्यांच्या बरोबरीने बाजार भाव द्यावा लागल्यामुळे संस्थेचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. संस्थेच्या उत्पादनाची मागणी असणारे सर्व पूरक व्यवसाय बंद होते. त्यामुळे संस्थेकडे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात दूध पावडर आणि बटरचा साठा तयार झाला. यात संस्थेचे अतिरिक्त भांडवल गुंतले असतानाही स्व.संभाजीराजे थोरात यांच्या राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक व शेतकर्‍यांच्या हिताने भारावलेल्या क्रांतिकारी विचारांच्या प्रेरणेतून संस्था नेहमी दूध उत्पादक यांच्या हिताचा निर्णय घेत आली आहे हे सिध्द झाले. यापुढे देखील दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास व्यक्त केला.

तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, कामगार, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक, युवती, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, मित्रपरिवार आणि उद्योग समूहाच्या हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रदूषण विरहित दीपावली साजरी करण्याचे आवाहन एस. आर. थोरात उद्योग समूहाचे संचालक देवराज थोरात यांनी केले आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 116471

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *