कोविड रुग्ण वाढल्याने बेलापूर खुर्द सात दिवस ‘बंद’! नागरिकांनी काळजी घेण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात कोरोना संसर्ग वाढल्याने पुढील सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक कोरोना समितीने घेतला आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग टप्याटप्याने वाढत आहे. तालुक्यातील कारेगाव परिसरात 30 तर बेलापुर खुर्द परिसरात 15 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून दोन्ही गावात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

गुरुवारी (ता.30) दिवसभरात तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या 200 हून अधिक झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. मागील काही दिवसांत तालुक्यातील कोविड रुग्ण वाढल्याने नागरीकांनी विशेष काळजी घ्यावी, बेलापूर खूर्द परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गाव बंद ठेवण्याचे, आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक कोरोना समितीने बेलापूर खुर्द गावातील प्रवेशद्वार तसेच गावात जाणार्‍या सर्व प्रमुख रस्त्यावर बॅरिकेट्स लावले आहे. त्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. व्यावसायिकांनी दुकाने खुले ठेवल्यास कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

प्रारंभी व्यावसायिकांनी दुकाने खुली ठेवण्याची मागणी केली होती. मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. बेलापूर खुर्द परिसरात सध्या 15 सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण असून येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गावातील गर्दीला रोख लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपसरपंच अ‍ॅड.दीपक बारहाते यांनी दिली. ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा संर्सग वाढत असल्याने कोविड रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणी वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तसेच सक्रीय रुग्ण असलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी सांगितले.

Visits: 132 Today: 1 Total: 1594960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *