घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर खुलणार शिर्डीचे साई मंदिर प्रसादालय, धर्मशाळा व दर्शनबारीच्या सफाईचे नियोजन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईसमाधी मंदिर 7 आक्टोबर रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी दर्शन, निवास व भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्याकरिता गुरुवारी (ता.30) पहिली बैठक साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या उपस्थितीत पार पडली. कोविड नियमांचे पालन, रेल्वे व विमानतळावर कोविड चाचण्यांची व्यवस्था, तसेच स्थानिकांच्या कोविड लसीकरणास वेग देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक सुनील श्रीवास्तव, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी शिंदे म्हणाले, साई मंदिर खुले झाल्यानंतर कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. तालुक्यात अद्यापही रुग्णसंख्या वाढती आहे. रेल्वे व विमानतळावर भाविकांची कोविड चाचणी केली जावी. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रसादालय, धर्मशाळा व दर्शनबारीच्या सफाईचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत, साईसंस्थान व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून भिकारी हटाव मोहीम हाती घेतली जाईल असे सांगितले.

दर्शनबारीतील भाविकांची कोविड चाचणी
दैनंदिन बारा ते तेरा हजार भाविकांना साईदर्शन देण्याची व्यवस्था करता येते. टप्प्याटप्प्याने ही संख्या अठ्ठावीस हजारांपर्यंत वाढविता येते, असा साईसंस्थानचा पूर्वानुभव आहे. दर्शनबारीतील चाळीस ते पन्नास भाविकांच्या कोविड चाचण्या करून कोविड संसर्ग फैलावाचा अंदाज घेतला जाईल. त्यादृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती साई संस्थानच्या वरीष्ठ अधिकार्यांनी दिली.

7 ऑक्टोबर रोजी साई मंदिर खुले होईल. पहिल्याच दिवशी स्पाईस जेटची प्रवासी विमानसेवा सुरू होईल. ज्या शेतकरी व व्यापार्यांना विविध महानगरांत कार्गो सेवेद्वारे आपला शेतमाल पाठवायचा आहे, त्यांनी संपर्क साधावा.
– कृष्णा शिंदे (व्यवस्थापक, स्पाईस जेट कार्गो सेवा)
