वीरगाव फाट्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अवैध धंद्यांचे ठिकाण बनलेल्या वीरगाव फाट्यावरील जुगार अड्ड्यावर थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.7) छापा टाकत बारा जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत 25 हजार 110 रुपयांच्या मुद्देमालासह प्रतिष्ठित जुगार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वीरगाव फाट्यावर जुगार, अवैध दारुविक्री, मटका आणि जुगार राजरोसपणे चालू राहते. येथीलच एका कोंबड्यांच्या शेडमध्ये राजेंद्र ताया लोखंडे, भरत सुखदेव गायकवाड (रा.शाहूनगर, अकोले), अनिल निवृत्ती वाकचौरे (रा.निंब्रळ), माणिक सखाराम चासकर (बहिरवाडी), दिलीप काळू शिंदे (रा.शाहूनगर), अचानक दामोदर गायकवाड (रा.इंदोरी), भानुदास रावबा गोर्डे (रा.बहिरवाडी), संदीप जयराम वैद्य (रा.अकोले), मोरेश्वर शांताराम चौधरी (रा.अकोले), जयराम धोंडू लांघी (रा.शेणित), पुंडलिक देवराम भिडे (अकोले) व अक्षय मारुती वाकचौरे (रा.परखतपूर) या बारा जणांना तिरट नावाचा हार-जितीचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अकोले पोलीस करत आहे. दरम्यान, धामोडी फाट्यानजीक असणार्या पेट्रोल पंपाजवळही अवैध दारुविक्री होत असताना पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने येथेही कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.