धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर मंदावला! निळवंडेचा विसर्ग वाढण्याची शक्यता लांबली; लाभक्षेत्रात सूर्यदर्शन

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या 48 तासांपासून मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पावसाचा झंझावात आज सकाळपासून मंदावला आहे. त्यामुळे धरणांच्या दिशेने सुरु असलेली पाण्याची आवकही खालावल्याने हंगामात सलग दुसर्‍यांदा प्रवरानदीला मोठा पूर शक्यता आता लांबली आहे. सध्या निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सात हजारांहून अधिक क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असून प्रवरा दुथडी भरुन वाहत आहे. तर ओझर बंधार्‍यावरुन जायकवाडी धरणाकडे सुमारे पाच हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. मुळा धरणातूनही सध्या 3 हजार 255 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

आपल्या लहरी स्वभावाचे दर्शन घडविणार्‍या मान्सूनने यंदा पाणलोटासह लाभक्षेत्रालाही हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होवू लागली होती. मात्र मोठ्या विश्रांतीनंतर 19 जुलै पूसन पावसाचे सर्वदूर पुनरागमन झाले आणि खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा सुरु झाली. दहा-बारा दिवस बरसलेल्या पावसाने ऑगस्ट येतायेता पुन्हा दडी मारल्याने जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आला, मात्र ऑगस्टच्या अगदी शेवटी पुन्हा एकदा वरुणराजा परतला आणि त्याने खरीप पिकांना जीवदान देण्यासोबतच आटलेल्या धरणसाठ्यांमध्ये मोठी भर घालीत त्यांना क्षमतेच्या दिशेने नेण्याची भूमिका बजावित पुन्हा एकदा दडी मारली.

गेल्या पंधरवड्यात भंडारदरा, त्यानंतर निळवंडे धरण भरल्याने या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात सोडले गेले. मात्र काही तासांतच पावसाचा जोर ओसरल्याने जवळपास 35 हजार क्युसेकपर्यंत वाढलेला निळवंडेचा विसर्ग कमी झाला आणि अवघ्या आठ-दहा तासांतच उत्तरेतील पूरस्थिती नियंत्रणात आली. या पावसाने ही दोन्ही धरणं तुडूंब भरल्याने येणार्‍या कालावधीत पाऊस झाल्यास पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता मात्र कायम होती, ती मंगळवारी प्रत्यक्षात उतरु पाहत होती. मागील 48 तासांत मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मो या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाली.

त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भंडारदर्‍यातून 2 हजार 34 क्युसेक तर निळवंडे धरणातून 4 हजार 753 क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने रात्री साडेआठच्या सुमारास भंडारदर्‍याचा विसर्गात आणखी वाढ करुन तो 3 हजार 252 क्युसेकवर नेण्यात आला. तर रात्री 11 वाजता भंडारदर्‍यातून 4 हजार 396 क्युसेक तर निळवंड्यातून 6 हजार 339 क्युसेकने पाणी सोडण्यात सुरुवात झाल्याने उत्तर नगर जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भिती निर्माण झाली होती. रात्रभर कोसळलेल्या पावसाचे पाणी कडेकपारीतून वाहत धरणात दाखल होवू लागल्याने आज सकाळी सहा वाजता भंडारदर्‍याचा विसर्ग 5 हजार 540 क्युसेकवर तर निळवंडे धरणाचा एकूण विसर्ग 7 हजार 133 क्युसेकवर नेण्यात आला होता. सध्या याच वेगाने पाणी सोडले जात असून सकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता मावळली आहे.

गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील घाटघर येथे 116 मिलीमीटर, पांजरे 105 मिलीमीटर, भंडारदरा 97 मिलीमीटर, रतनवाडी 75 मिलीमीटर, वाकी 65 मिलीमीटर, निळवंडे 31 मिलीमीटर, आढळा 06 मिलीमीटर, अकोले 21 मिलीमीटर, कोतुळ 15 मिलीमीटर व संगमनेर मध्ये 06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळा, भंडारदरा व निळवंडे ही तिनही धरणे तुडूंब असल्याने धरणात दाखल होणार्‍या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदर्‍यातून निळवंड्यात 216 दशलक्ष घनफूट तर निळवंड्यातून प्रवरानदीपात्रात 302 दशलक्ष घनफूट पाणी सोडले गेले आहे. आज सकाळी आढळा धरणात 982 दशलक्ष घनफूट (92.64 टक्के) तर भोजापूर धरणात 193 दशलक्ष घनफूट (53.46 टक्के) इतका पाणीसाठा आहे.

Visits: 155 Today: 2 Total: 1111876

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *