प्रत्येक भारतीयाने एकदातरी एव्हरेस्ट शिखर सर करावे ः झिरपे कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत ‘हिमालयातील दिवस’ विषयावर गुंफले पाचवे पुष्प

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर अनुभविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आयुष्यामध्ये एकदा तरी शिखर सर करून तेथील वातावरणाचा अनुभव घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी केले.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘हिमालयातील दिवस’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे बोलत होते. या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी संगमनेर दूध संघाचे संचालक मोहन करंजकर हे होते. तर व्यासपीठावर कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, उपाध्यक्ष तथा प्रकल्प प्रमुख अरुण ताजणे, सेक्रेटरी जसपाल डंग, डॉ. अनिल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्याख्यानात पुढे बोलताना झिरपे म्हणाले, माऊंट एव्हरेस्टवरील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. अति उंचीवर गेले तर हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी कमी होत जाते. तर तापमान वाढत जाते, तसेच वारे वेगाने वाहत असतात. एव्हरेस्टवर प्राणवायूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ही चढाई करताना प्रत्येक गिर्यारोहकाला कृत्रिम प्राणवायू वापरावा लागतो असे सांगून ते म्हणाले, माझ्या संघातील 12 गिर्यारोहकांनी ही चढाई करत एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा झेंडा फडकावत विक्रम केला. आत्तापर्यंत एव्हरेस्टवर एवढ्या मोठ्या संख्येने चढाई करणारा दुसरा संघ जगात कुठलाच सापडणार नाही. त्यामुळे आमच्या संघाची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली असल्याचे सांगितले.

याचबरोबर जगातील अनेक गर्यारोहक विविध शिखरे सर करण्यासाठी जात असतात. मात्र ते पुन्हा सुखरूप येणे अगदी अवघड काम असल्याचे नमूद करुन आमच्या संघाने अनेक उंचच उंच शिखरे सर करून सुखरूप खाली आलो असल्याचे सांगितले. चीन आणि नेपाळ या दोन विभागामध्येच हिमालय पर्वत विभागाला गेला आहे. यातील 14 पैकी 6 शिखरे भारतात आहेत. 6 शिखरे पाकिस्तानमध्ये तर 2 शिखरे तिबेट आणि चीनमध्ये असल्याची माहिती दिली. त्यामुळे एकदातरी प्रत्येक भारतीयाने एव्हरेस्ट शिखर सर करावे असे आवाहन शेवटी आवर्जुन केले.
