पठारावरील वाळूतस्करी काही केल्या थांबेना! जेसीबीसह दोन ट्रॅक्टर ताब्यात; वस्तुस्थितीत बदल घडविण्याचाही प्रयत्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याला लागलेले वाळूतस्करीचे ग्रहण काही केल्या सुटण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र पठारभागातून समोर येत आहे. राजकीय व प्रशासकीय आशीर्वादाने तालुक्यात सुरु असलेला वाळूतस्करीचा हा खेळ आता पठारभागासाठी सामान्य झाल्याचे चित्र असून मुळा नदीपात्राकडे जाणारा प्रत्येक रस्ता त्याची साक्ष देत आहे. दादा, अण्णांच्या नावाने चांगभले म्हणत अनेकांनी आता या बिनभांडवली धंद्यात उड्या घेतल्याने तालुक्यातील नद्यांचे पात्र दररोज ओरबाडले जात आहे. पठारभागात तर आता यंत्राच्या सहाय्याने तस्करी करणार्यांमध्ये एकप्रकारची स्पर्धाच लागली आहे. त्यासाठी अनेकांनी नवेकोरे जेसीबी यंत्रही खरेदी केले असून मंगळवारी त्यातील एका यंत्रासह दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र आता ताब्यात घेतलेला जेसीबी नदीपात्रात नव्हे तर रस्त्यावर उभा असल्याचे चित्रही निर्माण केले जावू लागल्याने ही कारवाईच संशयात अडकली आहे.

गेल्या काही वर्षात वाळूतस्करांचा तालुका म्हणून उदयास आलेल्या संगमनेर तालुक्यातील पाचही नद्यांच्या पात्रात वाळूतस्करांचा अक्षरशः धुमाकूळ सुरु आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेता संगमनेरनजीकच्या प्रवरापात्रातील तस्करांवर अधुनमधून एखाद दुसरी कारवाई होत असली तरी उर्वरीत नद्या मात्र तस्करांना आंदन दिल्यासारखे भयानक चित्र दिसत आहे. त्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या वाळूतस्करांनी आता मजुरांचा वापर करणे कमी केले असून अनेक टोळ्यांनी तर आता थेट जेसीबी यंत्राचा वापर करुन कमी वेळेत अधिक वाळू उपसण्याचा धंदा सुरु केला आहे. त्यामुळे पठारभागातील जेसीबी यंत्रांच्या संख्येतही गेल्या काही महिन्यात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

मंगळवारी (ता.28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोटा शिवारातील शेळकेवाडी परिसरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी घारगावच्या मंडलाधिकार्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या परिसरात छापा घातला असता हर्षद खालिद शेख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्र.एम.एच.15/ए.8644) व गोरख रावसाहेब रोडे (रा.येठेवाडी) यांच्या मालकीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व त्यासोबतच नवनाथ सखाराम आहेर यांच्या मालकीचे जेसीबी यंत्र वाळूतस्करी करीत असल्याचे त्यांना आढळले. ही सर्व वाहने व यंत्र ताब्यात घेवून सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांनी घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या वृत्ताने घारगाव-बोटा परिसरातील वाळूतस्कारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईत पकडण्यात आलेला जेसीबी प्रत्यक्ष नदीपात्रातून वाळू उपसा करीत असल्याची काही प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. मात्र सध्या सदरचा जेसीबी हा नदीपात्रात नव्हे तर त्यालगतच्या रस्त्यावर उभा होता, म्हणजेच त्याचा आणि या वाळूतस्करीचा कोणताही संबंध नाही असे चित्र रंगवण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन पठारावरील वाळूतस्कर आणि त्यांचे वरदहस्त यांची सहज कल्पना येते.

