करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या जानेवारीनंतर बैठकाच नाही! मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवेंनी मांडली व्यथा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
करोनामध्ये ज्यांच्या पतीचे निधन झाले, अशा महिलांना आधार देण्यासाठी मिशन वात्सल्य उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांच्या माध्यमातून या एकल महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा उद्देश होता. दर आठवड्याला या बैठका व्हाव्यात, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र, अहमदनगर जिल्ह्यात अशा बैठका जानेवारीनंतर झाल्याच नसल्याचे पुढे आले आहे.

या महिलांच्या अडचणी, समस्यांना वाचा फोडून पुनवर्सनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र करोना एकल महिला पुनर्वसन समिती अहमदनगर जिल्ह्यात स्थापन झाली. राज्यभरात तिचा विस्तार होऊन सरकारदरबारी मंत्री, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केल्यानंतर मिशन वात्सल्य अभियानचा जन्म झाला. महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी 27 ऑगस्ट, 2021 रोजी राज्यभरात तालुकास्तरावर मिशन वात्सल्य समित्या स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार तहसीलदारांना समितीचे अध्यक्ष व पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्पाधिकार्यांना सदस्य सचिव करण्यात आले. समितीच्या बैठका दर आठवड्यात घेण्याचे आदेश आहेत. पण अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात या समित्यांच्या बैठका आठवडाभरात तर नाहीच, पण महिनाभरातही होत नसल्याची व्यथा करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे मांडली आहे.
तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कृती दलाच्या बैठकीत घेण्याचे आदेश आहेत. पण तहसीलदार, बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्या प्रमाणेच शासन आदेशाची अंमलबजावणी व देखरेख करण्याची जबाबदारी असलेले जिल्हाधिकारी देखील नियमित बैठका न घेता स्वतःच शासन निर्णय पायदळी तुडवित असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. ते स्वतः अशासकीय सदस्य असलेल्या श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समितीने तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा महिला बालविकास अधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत माहिती दिलेली नाही.

करोनाविषयक अहमदनगर जिल्हा कृती दल व तालुकास्ततरीय मिशन वात्सल्य समिती बैठकांच्या विषयपत्रिका, इतिवृत्त यांची साळवे यांनी माहिती अधिकारात कृती दलाचे सदस्य सचिव असलेले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. बी. वारूडकर यांच्याकडे मागणी केली होती. पण दोन महिन्यानंतरही राहुरीचा अपवाद सोडल्यास जिल्हा दलासह एकाही समितीचे इतिवृत्त मिळालेले नाही, असे साळवे यांनी सांगितले. सप्टेंबर ते 31 जानेवारी, 2022 अखेर मिशन वात्सल्य समितीच्या दर आठवड्याला एक याप्रमाणे एकूण 24 बैठका अपेक्षित होत्या, असेही त्यांनी सांगितले.
