देशाच्या आत्माला खर्‍याअर्थी आज स्वातंत्र्य मिळाले : स्वामी गोविंददेव गिरिजी

नायक वृत्तसेवा, संगमनेर

परकीय आक्रमक जेव्हा देशाला लुटण्यासाठी नव्हे तर आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी देशावर हल्ले करीत होते तेव्हा या अंधःकारातून आता आपण बाहेर पडू का असा प्रश्‍न निर्माण झाला होता. छत्रपतींनी रायगडावर राज्याभिषेक करवून हिंदुराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली, तो क्षण संपूर्ण भारतासाठी युगे न् युगे सुवर्णक्षण ठरला. तर गेल्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा शुभारंभ करुन देशाने दुसर्‍या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे परखड मत राष्ट्रसंत, श्रीराम मंदिर न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी व्यक्त केले.

     येथील लायन्स क्लब संगमनेर सफायरने देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यौत्सवाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कोविडच्या संसर्गामुळे यंदा डिजीटल प्लेटफॉर्मचा वापर करुन सादर झालेल्या या ऑनलाईन स्वातंत्र्यौत्सवाला संगमनेरसह राज्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी आपल्या तासाभराच्या मनोगतातून पारतंत्र्यपूर्व भारताच्या गौरवशाली इतिहासापासून श्रीराम मंदिराच्या पायापूजन समारंभापर्यंतचा इतिहास उलगडतांना नानाविध दाखले देत परकीय आक्रमांचे हल्ले, त्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही न मिळालेले स्वातंत्र्य आदींचा विस्तृत ऊहापोह केला.

     यावेळी पुढे बोलतांना स्वामीजी म्हणाले की, एखादा परकीय सम्राट जेव्हा आपल्या देशात येत असतं तेव्हा दहा-दहा हजार नागरिकांचे शिरच्छेद करुन त्यांच्या मुंडक्यांचे तोरण त्याच्या स्वागतासाठी लावले जायचे. त्यामुळे संपूर्ण भारतीय समाज भयभीत झाला होता. मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे घडत होती. अशा विलक्षण वातावरणात मानसिक पराभव पत्करुन अत्याचार सहन करणार्‍यांच्या मनात प्राण फुंकण्यासाठी एका तेजस्वी पुरुषाचा उदय झाला. परकीय आक्रमकांच्या रणकंदनात झालेला शिवरायांचा राज्याभिषेक केवळ एका व्यक्तिचे राज्यारोहन नव्हते तर, तो देशाच्या अस्मितेचा राज्याभिषेक होता, त्यामुळेच भारतीय इतिहासात युगे न् युगे हा सुवर्णक्षण म्हणूनच जनमानसाच्या मनात कायम राहील.

     या शतकातही एक सुवर्णक्षण घडला आहे असे सांगतांना स्वामीजींनी गेल्या 5 ऑगस्टरोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या पायाभरणी उत्सवाचा दाखला दिला. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश गोर्‍या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तो क्षण देशासाठी खुप मोठा आणि मंगल होता. त्यामागे लाखों लोकांचे समर्पण आणि बलिदान होते. मुघलांनी आपल्या देशावर शक्तिच्या जोरावर पाशवी आक्रमण केले, तर इंग्रजांनी बुद्धिच्या जोरावर आपल्या देशावर राज्य केल्याचे स्वामीजी म्हणाले.

     श्रीराम मंदिरासाठी झालेल्या पाच शतकांच्या संघर्षाला हिंदु-मुस्लिम संघर्ष म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत विदेशी आक्रमकांचे पदचिन्ह नष्ट करणे हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगीतले. 5 ऑगस्टरोजी श्रीराम मंदिराच्या कार्याचा शुभारंभ म्हणजे देशाच्या नव्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण खंडीत राजकीय स्वातंत्र्य मिळवले खरे मात्र देशाच्या मानबिंदुंच्या स्वातंत्र्याचा शुभारंभ खर्‍याअर्थी आत्ता झाला. देशाला मिळालेलं पहिलं स्वातंत्र्य सामान्य होतं, आता मिळणारं स्वातंत्र्य हे भारतीय आत्माला मिळालेलं स्वातंत्र्य असेल असेही त्यांनी शेवटी बोलतांना सांगीतले.

     डिजीटल माध्यमातून सादर झालेल्या यंदाच्या 17 व्या स्वातंत्र्यौत्सवामागी संकल्पना विशद् करतांना लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक गिरीश मालपाणी यांनी सद्यस्थिती आणि भारतीय उत्सव यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी गेल्या 16 वर्षांपासून सुरु असलेल्या स्वातंत्र्यौत्सवाचा धावता आढावाही ऑनलाईन प्रेक्षकांसमोर मांडला. या अनोख्या उत्सवाला केवळ स्थानिकच नव्हे तर राज्यभरातील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून गिरीश मालपाणी, राजेश रा.मालपाणी व धनंजय धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

लायन्स क्लब संगमनेर सफायरने 2003 साली लाल बहाद्दुर शास्त्री चौकात पहिला ‘स्वातंत्र्यौत्सव’ साजरा केला होता. या कार्यक्रमाला संगमनेरकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याने त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी या उत्सवाची व्यापकता वाढवण्यात आली. देशभक्तिपर गीतांचे कार्यक्रम, नृत्यस्पर्धा, स्वातंत्र्य समरात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा व भारतीय लष्करी सेवेत असणार्‍या तालुक्यातील जवानांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता, नानाविध वक्त्यांची व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांनी गेली सोळा वर्ष हा उत्सव सुरु होता. यंदा मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे ‘ऑनलाईन’ उत्सव साजरा करावा लागला, मात्र त्यालाही संगमनेरसह राज्यभरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Visits: 76 Today: 2 Total: 1110810

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *