आज सायंकाळपर्यंत भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरणार! रतनवाडीत सलग दुसर्‍या दिवशी तुफान पाऊस; लाभक्षेत्रात मात्र भुरभूर

नायक वृत्तसेवा, अकोले
मोठ्या कालावधीपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात पुनरागम झाले असून धरणांच्या पाणलोटात सुरु असलेली संततधार कायम असल्याने धरणांचा प्रवास ओव्हर फ्लोच्या दिशेने सुरु झाला आहे. रतनवाडीत सलग दुसर्‍या दिवशी तुफान पाऊस कोसळत असून शुक्रवारच्या तुलनेत भंडारदर्‍यातील पाण्याची आवक दुप्पट झाली आहे. त्यामुळे धरणाचा एकूण पाणीसाठा जलदगतीने वाढू लागला असून पावसाचा जोर टिकून राहिल्यास आज सायंकाळपर्यंत भंडारदरा धरणा तांत्रिकदृष्ट्या (10 हजार 500 दशलक्ष घनफूट) भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उर्वरीत मोठ्या धरणांच्या पाणलोटातही पाऊस टिकून असून कोतूळ जवळील मुळानदीचे पात्रही फुगले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणलोटासह लाभक्षेत्रातून गायब झालेला पाऊस गेल्या आठवड्याच्या शेवटी जिल्ह्यात परतला. सुरुवातीला लाभक्षेत्रातील बहुतेक सर्व तालुक्यांत हजेरी लावणार्‍या पावसाने पाणलोटाला मात्र पाठ दाखवल्याने एकीकडे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे अर्धवट भरलेल्या धरणांची चिंता असे विरोधाभासी चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. मात्र गेल्या सहा दिवसांतील पावसाने या सर्व चिंता आता दूर सारल्या असून धरणांच्या दिशेने वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे.

सलग दुसर्‍या दिवशी भंडारदर्‍याच्या पाणलोटातील रतनवाडीत तुफान पाऊस सुरु असून गेल्या चोवीस तासांत तब्बल पाच इंच (127 मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. पाणलोटातील उर्वरीत भागात रतनवाडीच्या तुलनेत पावसाला फारसा जोर नसला तरीही संततधार कायम असल्याने सह्याद्रीच्या कडेकपारीतून मरगळलेल्या ओहोळांना गती मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर अवघ्या चोवीस तासांतच भंडारदर्‍यात सर्वाधिक 390 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर टिकून असून कळसूबाईच्या गिरीशिखरांवर सुरु असलेल्या पावसाने वाकी जलाशयावरील प्रापात वाढला आहे. त्यामुळे निळवंड्याच्या जलसाठ्यातही 114 दशलक्ष घनफूटाची नव्याने भर पडली आहे.

मुळा नदीच्या खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाच्या परिसरात कोसळणार्‍या जलधारांनी मुळेचे पात्र पुन्हा एकदा फुगवले असून शुक्रवारच्या तुलनेत कोतुळनजीकच्या पात्रातून दुप्पट वेगाने पाणी वाहत आहे. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणात 359 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. आज सकाळी सहा वाजता कोतुळजवळील मुळापात्रातून 7 हजार 342 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत असून त्याच प्रमाणात मुळा धरणात पाण्याची आवक सुरु आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाला जोर चढला असला तरीही उत्तरेकडील आढळा व भोजापूर धरणांना मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याने यंदा ही दोन्ही धरणं भरण्याच्या आशा मावळत असल्याने लाभक्षेत्रात चिंता निर्माण झाल्या आहेत.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी येथे 127 मिलीमीटर, घाटघर 81 मिलीमीटर, भंडारदरा 70 मिलीमीटर, पांजरे 69 मिलीमीटर, वाकी 51 मिलीमीटर, निळवंडे 18 मिलीमीटर, आढळा 01 मिलीमीटर, कोतूळ 01 मिलीमीटर, अकोले 16 मिलीमीटर व संगमनेर येथे पाच मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी मुळा धरणातील एकूण पाणीसाठा 21 हजार 529 दशलक्ष घनफूट (82.80 टक्के), भंडारदरा 10 हजार 323 दशलक्ष घनफूट (93.51 टक्के), निळवंडे 6 हजार 721 दशलक्ष घनफूट (80.78 टक्के), आढळा 579 दशलक्ष घनफूट (54.62 टक्के) व भोजापूर 85 दशलक्ष घनफूट (23.55 टक्के) इतका पाणीसाठा आहे.

Visits: 18 Today: 2 Total: 116766

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *