गस्तीवरील पोलिसांनी मोबाईलच्या कॅमेर्यात टिपली बिबट्याची छबी! घारगाव पोलिसांना रात्रीच्या गस्तीवर असताना घडले बिबट्याचे दर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतकरी आणि बिबट्या असे समीकरण असताना आता पोलिसांनाही बिबट्याचे दर्शन होत आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांचे पथक शुक्रवारी (ता.10) रात्री गस्तीवर असताना मध्यरात्रीनंतर सव्वाएक वाजेच्या सुमारास त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. वाहन समोर येऊनही बिबट्या बराच वेळ थाटात बसून होता. हे संपूर्ण चित्र पोलीस कर्मचार्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद केले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यातील पठारभाग दर्या-खोर्यांत विस्तीर्ण पसरलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. या ठाण्याअंतर्गत येणार्या गावांसह वाड्या-वस्त्यांवर रात्रीच्या वेळी चोर्या, दरोडे होवू नये म्हणून पोलीस रात्रीची गस्त घालतात. शुक्रवारी रात्री घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर लाड, चालक संतोष फड, गृहरक्षक दलाचे जवान मोहमद सय्यद हे गुरुवारी (ता.9) रात्री सरकारी वाहनातून परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सव्वाएक वाजेच्या सुमारास जुन्या माहुली येथील एकल घाटातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट कठड्यावर मोठ्या थाटात बिबट्या बसलेला दिसला.

बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने सर्वजण थबकले आणि वाहन थांबविले. वाहनाच्या प्रकाशझोतात बिबट्या दिसत होता. बराच वेळ लोटला तरी बिबट्या काही हटण्याचे नाव घेईना. अखेर बिबट्याने काही वेळानंतर धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार पोलीस कर्मचारी किशोर लाड यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद केला आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने निसर्ग फुललेला आहे. यामुळे जंगली श्वापदांचा संचार वाढला आहे. शेतकरी देखील रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास धजावत नाहीये. मात्र, अलिकडच्या काळात बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे कल वाढल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेची आहे, असेही पोलीस कर्मचारी लाड म्हणाले.
