धक्कादायक! अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे लोण ग्रमीणभागात! साकूर परिसरातील साडेसात वर्षीय बालकावर विकृताचा लैंगिक अत्याचार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

पठारभागातील अवैध धंदे कमी होते की काय म्हणून आता त्यात बालकावरील लैंगिक अत्याचाराची भर पडली आहे. सदरचा प्रकार पठारभागाची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या साकूर परिसरातून समोर आला असून या प्रकरणातील अल्पवयीन विकृताला घारगाव पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्याच्या ग्रामीणभागात खळबळ उडाली असून आजवर केवळ वाळुचोरीसह अन्य अवैध धंद्यांचे ‘हॉटस्पॉट’ ठरु पाहणार्‍या पठारभागातून सदरचा घृणास्पद प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.

     याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साकुर परिसरात राहणारा साडेसात वर्षीय बालक मंगळवारी (ता.23) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खेळत असताना परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय विकृताची नजर त्याच्यावर पडली. आसपास कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्या विकृताने सदर लहान बालकास काठीचा धाक दाखवून व त्याला मारहाण करीत बळजोरीने अक्षरशः फरफटत आडोशाला नेले. यावेळी त्या विकृताने चिमुरड्याला धाक दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सदरचा प्रकार आज सकाळी संबंधित बालकाच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या पोटच्या लहानशा जीवाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, मंगळवारी घडलेला हा घृणास्पद प्रकार समोर आला. त्यानंतर त्या बालकाच्या आई-वडिलांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ या बाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना दिली.  त्यांंच्या आदेशावरून घारगाव पोलिसांनी साकुर येथील 16 वर्षीय विकृता विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 324, 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे (पोस्को) कलम 6 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3(2)(5) 3(2) (5 अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने शहरी भागात होणारे बालकांवरील अत्याचाराचे प्रकार आता ग्रामीण भागातही पोहोचल्याचे दिसून येत असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करीत आहेत.

Visits: 129 Today: 5 Total: 1108736

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *