माणसांना जोडणार्या व्यक्तीचे नाव देण्याचा उपक्रम समर्पक : थोरात साईनाथ चौक ते स्वातंत्र्य चौक रस्त्याचे दिवंगत ‘प्रकाश बर्डे लिंकरोड’ असे नामकरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील माणसांना एकमेकांशी जोडणारे दुवे म्हणून अनेकांचा उल्लेख होवू शकतो, त्यात दिवंगत प्रकाश बर्डे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. गेल्या काही दशकांत माळेतील काही मणी निखळावे त्याप्रमाणे अशी काही माणसं आपल्यातून निघून गेली, मात्र त्यांच्या कार्याच्या स्मृती मागे राहिल्या. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रकाशरावांनी संगमनेरचे सांस्कृतिक वैभव वाढवण्यातही मोलाचे योगदान दिले आहे. अशा व्यक्तीचे नाव दोन महत्त्वाच्या भागांना जोडणार्या रस्त्याला देवून पालिकेने त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत प्रकाश बर्डे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्ताने संगमनेर नगरपरिषदेने साईनाथ चौक ते स्वातंत्र्य चौक या रस्त्याला त्यांचे नाव दिले. याप्रसंगी नामदार थोरात बोलत होते. यावेळी मंचावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी व मुख्याधिकारी राहुल वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले की, प्रकाशरावांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून पालिकेने या रस्त्याला दिलेले त्यांचे नाव अत्यंत समर्पक असेच आहे. त्यांचे संपूर्ण जीवन संगमनेरच्या सार्वजनिक क्षेत्रातील अविभाज्य भाग बनले होते. 1982 सालापासून आम्ही एकमेकांच्या सान्निध्यात आलो आणि कायमचे एकमेकांच्या मैत्रीबंधनात बांधले गेलो. 1985 सालच्या आपल्या पहिल्याच विधानसभा निवणुकीची संपूर्ण धुराही प्रकाशरावांसह त्यावेळच्या मित्रमंडळीने आपल्या खांद्यावर घेतली ती आजही त्यांच्याच खांद्यावर असल्याचा उल्लेखही थोरात यांनी यावेळी केला.
मित्रांना, माणसांना एकमेकांशी जोडणारा दुवा अशी त्यांची वेगळी ओळख होती. शब्द संपन्न असलेल्या प्रकाशरावांकडे तालुक्यातील सर्वच सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाची जबाबदारी असे. संगमनेरात दरवर्षी होणारा पहाट गाण्यांचा कार्यक्रम, राज्यभर लौकिक असलेली कवी अनंत व्याख्यानमाला व ऋषीपंचमीसारख्या कार्यक्रमातून त्यांची प्रतिभा अधिक ठळकपणे दिसून येत. त्यातूनच संगमनेरचे सांस्कृतिक वातावरण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असलेले राम शेवाळकर, प्रा.डॉ.शिवाजी भोसले यांच्यासारख्या प्रगल्भ माणसांचा सहवासही त्यांच्यामुळे लाभल्याचा दाखला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
अशा सगळ्याच घटकांना व त्यातून घडणार्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना एका सूत्रात गुंफण्याचे काम प्रकाशरावांनी केले. त्यांना श्रद्धांजली म्हणून दोन भागांना जोडणारा हा रस्ता सतत त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. अशाच श्रेणीत बसणार्या दिवंगत राधावल्लभ कासट यांच्याही नावाचा उल्लेख करीत नामदार थोरात यांनी राजकारणाच्या पलिकडे जावून चावडी चौकातील करवा मेडिकल ते कटारिया कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याची सूचना नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना केली. लोकशाहीत पक्ष आणि राजकारण हा भाग महत्त्वाचा असला तरीही संगमनेरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नसल्याचे नामदार थोरात यांनी यावेळी सांगितले.
डॉ.तांबे यांनी आजचा दिवस एकाअर्थी आनंदाचा आणि दुःखाचा असल्याचे सांगत प्रकाश बर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला. नेता नव्हे, मित्र अशी ओळख निर्माण करणारे प्रकाशराव नामदार थोरात यांच्या मित्रपरिवारातील महत्वाचा घटक होते. त्यांच्यातील विविध कला, निखळ मैत्रीचा त्यांचा स्वभाव, दिलखुलास वावरणे आणि गोरगरीब, गरजूंच्या मदतीसाठी सतत प्रयत्न करणे असे अनेक वैशिष्ट्य त्यांच्यात होते. संगमनेरात विविध राजकीय प्रवाह असतांना त्यांची नामदार थोरात यांच्याशी घट्ट नाळ जुळलेली होती, मात्र असे असतांनाही सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातूनच त्यांच्या सामाजिक कौशल्याचेही दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा तांबे यांनी संगमनेरच्या सांस्कृतिक जडणघडणीत प्रकाश बर्डे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. शब्द सम्राट प्रकाश बर्डे यांची प्रत्येक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच आठवण येते. आपल्या शब्दफेकीतून संपूर्ण सभा जिंकण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रगल्भ वाणीत होते. त्यांनी संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून काम करताना वंचित घटकांसाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत पुढाकार घेतल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. उद्योगपती राजेश मालपाणी यांनी ‘स्नेह संपन्न’ असलेल्या प्रकाश बर्डे यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगताना सार्वजनिक कार्यक्रमातील विविध किस्से उपस्थितांना सांगतिले. पालिकेचे गटनेते विश्वास मुर्तडक यांनी प्रास्तविक तर अनिल राठी यांनी सूत्रसंचालन केले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतात भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांच्या कार्याचा आढावा घेताना लोकशाहीत पक्ष व राजकारण यांना महत्व असले तरीही कासट यांनीही सार्वजनिक जीवनात वावरताना त्या पलिकडे जावून काम केल्याचा उल्लेख केला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चावडी चौक ते कटारिया कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याची जाहीर सूचना करीत त्यांनी संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाचेही दर्शन घडविले.